६०० व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय! गॉलमध्ये श्रीलंकेचा १६५ धावांनी दारुण पराभव

India vs Sri Lanka 1st Test | भारतीय क्रिकेट संघाने आपल्या ६०० व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात दिमाखदार कामगिरी करत श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवला. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. देवदत्त पडिक्कलचे शानदार शतक, ऋषभ पंतची फटकेबाजी आणि फिरकीपटू मानव सुथारच्या भेदक गोलंदाजीच्या (सामन्यात १० बळी) जोरावर भारताने यजमान श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्या डावात देवदत्त पडिक्कलने अप्रतिम फलंदाजी करत १६७ धावांची मॅरेथॉन खेळी केली, तर के. एल. राहुलने ८२ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या ४६२ पर्यंत पोहोचवली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९३ धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे कठीण आव्हान ठेवले.
हेही वाचा
विकासकामांच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाला ‘अल्टिमेटम’
मानव सुथारची फिरकी अन् लंकेचा डाव २०६ धावांत गारद
गॉलच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ३७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव २०६ धावांवरच आटोपला. श्रीलंकेकडून कर्णधार धनंजय डी सिल्वा (५९) आणि सोनल दिनूशा (८४) यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून फिरकीपटू मानव सुथारने दुसऱ्या डावात अवघ्या ५५ धावांत ६ बळी टिपले. त्याने पहिल्या डावातील ४ आणि दुसऱ्या डावातील ६ असे मिळून सामन्यात एकूण १० बळी घेत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.





