TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींनी मोदी-शहांचा सन्मान ठेवावा; हसन मुश्रीफ यांची टीका

‘इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा; राहुल गांधींना शरद पवारांकडून समज देण्याची विनंती करणार’

मुंबई : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका जरूर बजावावी; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत बोलताना त्यांनी पदाचा आणि वयाचा सन्मान ठेवावा, अशी टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांचे वय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा सन्मान ठेवून भाष्य करावे, असे मुश्रीफ म्हणाले.

इथेनॉल धोरणावर बोलताना मुश्रीफ यांनी या धोरणाचे समर्थन केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात इथेनॉल धोरणाची सुरुवात झाली होती. या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे भले झाले आहे, असा दावा त्यांनी केला.

इथेनॉलच्या पैशातून शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास मदत होते. तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही या धोरणाचा फायदा होत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होते, असे कोणत्याही वाहन कंपनीने सांगितलेले नाही. केवळ वाहनांचे मायलेज काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  महाराष्ट्रात दोन महिन्यांचे मिळणार ३ हजार, मध्य प्रदेशात रक्षाबंधनासाठी अतिरिक्त २५० रुपयांची भेट

शरद पवार यांनी गोविंद बाग येथे उसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. त्यावेळी इथेनॉल धोरणाबाबत राहुल गांधींना समजावून सांगण्याची विनंती पवार यांना करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्याच्या रस्त्यांच्या प्रश्नावरही मुश्रीफ यांनी भाष्य केले. पालकमंत्री म्हणून आपण महिन्यातून एक-दोन वेळा नंदुरबारला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुरतहून नंदुरबारकडे येताना गुजरातमधील बहुतांश रस्ता चांगला आहे; मात्र नंदुरबार जिल्ह्यातील काही भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. पालकमंत्री म्हणून ही परिस्थिती पाहून आपल्याला लाज वाटते, असे मुश्रीफ म्हणाले.

रस्त्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आंदोलन करणे हे त्यांचे काम आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही राज्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ रस्ते तयार करण्याची गरज आहे. सरकारे येतात आणि जातात; मात्र पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था खराब होण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे भविष्यात खड्डे पडणार नाहीत, अशा दर्जाचे रस्ते तयार करण्यावर भर दिला पाहिजे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button