ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळवडे, थेरगाव येथील प्रारूप सुधारित DP च्या हरकतींवर आता एकत्रित सुनावणी; हजारो नागरिकांना दिलासा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व नवनगर विकास प्राधिकरणाकडून सुनावणी पत्रिकेत महत्त्वाचा बदल

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप सुधारित विकास योजनेवर नागरिकांनी नोंदवलेल्या सूचना व हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया आता वेग घेत आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम २६(१) अन्वये दि. १५/०५/२०२५ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या योजनेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या हजारो हरकतींवर कलम २८(२) नुसार गठीत नियोजन समितीसमोर टप्प्याटप्प्याने सुनावणी सुरू आहे.

सुनावणी पत्रिकेत नागरिकांच्या सोयीसाठी बदल

आतापर्यंत पाठवण्यात येणाऱ्या वैयक्तिक सुनावणी पत्रांमध्ये केवळ हरकतदाराचे नाव, सर्वे क्रमांक आणि सुनावणीची तारीख-वेळ नमूद असे. मात्र आता या पत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आला असून, गावाचे नाव, संबंधित सर्वे क्रमांक, विषय आणि सुधारित विकास योजनेतील (डीपी) आरक्षणाचा तपशील यांचा स्पष्ट उल्लेख केला जाणार आहे. यामुळे हरकतदारांना आपली हरकत नेमकी कोणत्या आरक्षण वा रस्त्याबाबत आहे, हे सहज समजणार आहे.

हेही वाचा

PCMC: चऱ्होलीतील मूलभूत प्रश्नांसाठी सोसायट्यांची एकजूट!

तळवडे व थेरगावमध्ये मोठ्या संख्येने हरकती

तळवडे येथील घरजाई मंदिर परिसरातील २४ मीटर रस्त्याच्या प्रस्तावावर तीन हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. यावरील सुनावणी दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. थेरगाव येथे प्राधिकरणाचा २४ मीटर रस्ता आणि एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट) रिंग रोडसंदर्भातही मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्या असून, त्यावरील सुनावणी दि. २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष बाब म्हणजे, तळवडे व थेरगाव या दोन्ही ठिकाणी एकाच विषयाशी संबंधित सर्व हरकतदारांना एकाच वेळी, एकदाच सुनावणीसाठी बोलावले जाणार आहे. यामुळे एकाच रस्त्याच्या किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर हरकत घेतलेल्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशी माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली.

वैयक्तिक सुनावणी पत्रेही रवाना

यापूर्वीच अनेक हरकतदारांना वैयक्तिक सुनावणी पत्रे पाठवण्यात आली आहेत. उपसंचालक, नगर रचना तथा नगर रचना अधिकारी अनुपमा कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या अशा पत्रांनुसार, निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पेठ क्र. २६ या ठिकाणी सुनावणी आयोजित करण्यात येत आहे. हरकतदारांनी अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे, तसेच सोबतच्या क्यूआर कोडद्वारे उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास संबंधित हरकतदाराच्या अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने एकतर्फी निर्णय घेतला जाईल आणि पुन्हा सुनावणीची संधी दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नेमून दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button