एसटीच्या ताफ्यात पाच हजार नव्या ‘लालपरी’; प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी प्रवास
नव्या बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण; टाटा मोटर्सचा सर्वांत कमी दराचा देकार, जुन्या बसेसवरील ताण होणार कमी : प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने पाच हजार नव्या ‘लालपरी’ बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. या निविदेत टाटा मोटर्सने सर्वांत कमी दराचा देकार सादर केला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. पाच हजार नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे.
जुन्या बसेसवरील ताण होणार कमी
नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होऊन बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होणार आहे. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देतानाच जुन्या व गळक्या बसेस तसेच प्रवासादरम्यान बसेस बंद पडण्याच्या समस्येवरही प्रभावीपणे मात करता येणार आहे.
पुढील सहा महिन्यांत सुमारे पाच हजारांहून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत. त्यामुळे नव्या बसेसचा ताफ्यात समावेश एसटीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धनासाठी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कसोबत सहकार्याची अपेक्षा
आधीच २,६४० नव्या ‘लालपरी’ दाखल
एसटी महामंडळाने यापूर्वीच बसताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लालपरी’ बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नव्या बसेसच्या समावेशामुळे एसटीचा ताफा अधिक सक्षम आणि प्रवाशांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत होत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
‘मागेल त्याला बसफेरी’ देण्याचा प्रयत्न
पाच हजार नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, मागणी केलेली बसफेरी तोट्यात चालू नये, यासाठी संबंधितांनीही जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले.
ई-बसेसच्या दिशेने एसटीची वाटचाल
पाच हजार ‘लालपरी’ बसेसचा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बसच्या युगातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटी महामंडळाची वाटचाल अधिक वेगाने होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या बसेसचा समावेश आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देत एसटीला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची विश्वासू सोबती असलेल्या एसटीच्या ताफ्यातील ही वाढ केवळ बससंख्या वाढविणारी नसून, सुरक्षित, सुखकर आणि दर्जेदार प्रवासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद अधिक प्रभावीपणे साकार करण्यासाठी एसटी नव्या दमाने, नव्या तंत्रज्ञानासह आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी नमूद केले.





