पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ऑगस्टला महामोर्चा; सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत वाहतूक निर्बंध

पिंपरी-चिंचवड | क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड ते तहसीलदार कार्यालय, निगडी या मार्गावर १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शांततामय जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तात्पुरते वाहतूक बदल जाहीर केले आहेत.
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत मोरवाडी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मोरवाडी चौकाकडून वाहतूक कार्यालयासमोरील ग्रेडसेपरेटरमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा. अग्रसेन भवनजवळील पुणे-मुंबई ग्रेडसेपरेटरमधून सर्व्हिस रोडमार्गे खंडोबामाळकडे जाणाऱ्या वाहनांनाही निर्बंध राहणार आहेत. या वाहनांनी भक्ती-शक्ती मार्गाने इच्छित स्थळी जावे.
निगडी वाहतूक विभागात लोकमान्य हॉस्पिटल ब्रिजवरून महावीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई असून, त्यांनी अहिंसा चौकमार्गे जावे. दळवीनगर ब्रिजखालून बॉम्बेकडे जाणाऱ्या वाहनांनाही बंदी असून, दळवीनगर ओव्हरब्रिजमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करता येईल. आकुर्डी गावठाण, दळवीनगर ब्रिज आणि थरमॅक्स चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे येणाऱ्या वाहनांसाठीही वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा
आकुर्डी गावठाणकडून येणाऱ्या वाहनांनी आंबेडकर चौक-म्हाळसाकांत चौक मार्गाचा, दळवीनगर ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांनी गणेश व्हिजन-पंचरमार्गे आंबेडकर चौकाचा, तर थरमॅक्स चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी खडी मशीन वाय जंक्शनमार्गे परशुराम चौकाचा वापर करावा. खंडोबामाळ ग्रेडसेपरेटरमधून सर्व्हिस रोडला जाणाऱ्या वाहनांनी एसबीआय पंचरमार्गे इच्छित स्थळी जावे.
सेंट उर्सुला शाळेकडून प्रेस्टीज प्लाझाकडे जाणाऱ्या वाहनांनी सावली हॉटेलमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा. टिळक चौकाकडून भेळ चौक तसेच भक्ती-शक्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही तात्पुरती मनाई आहे.
१८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांच्या वाहतुकीवर आवश्यकतेनुसार निर्बंध लागू राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.





