चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचने रस्ते दुरुस्तीचे निर्देश; १४ विभागांची समन्वय समिती स्थापन होणार

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रस्ते दुरुस्तीच्या कामात प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या भागातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात या पट्ट्याचे महत्त्व लक्षात घेता वाहतूक कोंडीचा प्रश्न अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांवर मर्यादा येतात. त्यामुळे ठाणे-नाशिक मार्ग आणि कशेडी बोगद्याच्या धर्तीवर प्री-कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासोबतच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा पर्यायही वापरावा, असे शिंदे यांनी सांगितले. रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
हेही वाचा – मुंबईत गणेशोत्सव मंडपासाठी ऑनलाइन ‘एक खिडकी’ परवानगी; खड्डा खोदल्यास २ हजारांचा दंड
चाकण परिसरातील रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन या परस्परांशी संबंधित प्रश्नांचा एकत्रित विचार करून एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांची समिती काम करणार आहे.
जिल्हाधिकारी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर नियमित देखरेख ठेवण्यास मदत होणार आहे.
चाकण शहराचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला विकास आराखडा लवकरच मंजूर केला जाईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, रुग्णालये आणि नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उरण-कर्जत-राजगुरुनगर-शिरूर-पुणे महामार्ग तसेच छत्रपती संभाजीनगर-रांजणगाव-चाकणला जोडणाऱ्या समर्पित मालवाहतूक मार्गामुळे या परिसरातील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष दिल्याने उद्योजकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.





