रत्नागिरीच्या राजापूरमध्ये भीषण अपघात, 8 ते 10 जण गंभीर जखमी

Ratnagiri Accident | उद्या, १४ सप्टेंबर रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत असतानाच कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या उत्साहावर अपघाताचे सावट पसरले आहे. मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या गावाकडे निघालेल्या गणेशभक्तांच्या ‘फोर्स अर्बेनिया’ या खासगी वाहनाला मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनातील ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले असून सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात रविवारी सकाळी हातिवले येथील अंकिता पॅलेस हॉटेलसमोर घडला. वाहनामध्ये अंदाजे १५ प्रवासी प्रवास करत होते. अपघाताचा जोर इतका भीषण होता की गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे गावचे रहिवासी असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे.
हेही वाचा
शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
महामार्गावर कोंडी अन् रेल्वेचाही खोळंबा
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून लाखो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. महामार्गावर माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अवघे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना २ ते ३ तास लागत आहेत. त्यातच कोकणात जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्याही विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा बिकट परिस्थितीत राजापूरजवळ झालेल्या या अपघातामुळे कोकणात निघालेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.




