राष्ट्रप्रेमाच्या रंगात रंगली गायत्री स्कूल; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत, भाषणे व जनजागृतीने मोशी परिसर भारावला

मोशी | स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शाळा प्रांगणात देशभक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संस्थेचे विपणन अधिकारी मा. श्री. शैलेंद्र सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी सस्मित राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
विद्यार्थ्यांनी ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ या विषयावर प्रभावी जनजागृती सादर केली. तसेच इंग्रजी, संस्कृत, मराठी व हिंदी भाषांमधून स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी या विषयांवर भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही यावेळी पार पडला. कार्यक्रमाला गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव भोंगाळे, संचालक श्री. योगेश भोंगाळे, नगरसेविका मा. सौ. कविताताई भोंगाळे-पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. संजय भोंगाळे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत तसेच संस्थेचे विपणन अधिकारी मा. श्री. शैलेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हेही वाचा

यावेळी पालक-शिक्षक संघटनेचे पालकवृंद तसेच नव्याने नियुक्त झालेल्या विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि घटनात्मक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृती, समता, सेवा आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये जपण्याचा संदेशही त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले व उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी व राष्ट्रप्रेमाच्या उत्साहाने भारावून गेला होता. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.





