‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; नाशिकच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण

‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; नाशिकच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ कुंभपर्व’ माहिती पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा ‘पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री’ असा उल्लेख करण्यात आल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा अद्याप कायम असताना पुस्तिकेवर महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने या उल्लेखाचा नेमका अर्थ काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन आणि कुंभ आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते. पुस्तिकेच्या मागील बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच गिरीश महाजन यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. याच छायाचित्रांखाली महाजन यांचा ‘पालकमंत्री व कुंभ पर्व मंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या काही काळापासून महायुतीमध्ये चर्चा आणि रस्सीखेच सुरू आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या नियोजनाची आणि विविध विकासकामांच्या समन्वयाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तिकेवरील ‘पालकमंत्री’ या उल्लेखामुळे हा केवळ मुद्रणातील किंवा प्रशासकीय स्तरावरील उल्लेख आहे की भविष्यातील राजकीय निर्णयाचे संकेत आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

हेही वाचा –  स्वातंत्र्यदिनानिमित्त निखिल बोऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर कथित ५३० कोटी रुपयांच्या बनावट टेंडर प्रकरणामुळेही नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तनय महाजन याला मुंबईतून अटक केली होती. तो गिरीश महाजन यांचा नातेवाईक असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला कुंभमेळ्याच्या कामांसाठी टेंडर वाटप करणारा अधिकारी असल्याचे भासवून काही जणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सरकारच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी केल्याचाही आरोप आहे. या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेवरील महाजन यांच्या उल्लेखासह या प्रकरणाचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *