ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात

पिंपरी-चिंचवड | देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तथा माजी नौदल अधिकारी किरण गाडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

यानंतर नेहा शेटे यांनी सुमधुर आवाजात ‘वंदे मातरम्’ गीत सादर केले. राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीतानंतर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रतिज्ञेसह अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा घेत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. शाळेच्या एमसीएफ व स्काऊट-गाईड पथकांनी उत्कृष्ट संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त व प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची माहिती देत यंदा ‘नागरी सजगता वर्ष’ ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक व विद्यार्थ्यांशी संवाद वाढविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ‘पालक कट्टा ऑनलाइन’ उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शाळेच्या डिजिटल पॅनल टीव्हीचे उद्घाटनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पाचवी ते सातवीच्या गटातील कथाकथन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कुमारी सलोनी चोरघडे व शुभ्रा प्रभाळे यांनी कथासादरीकरण केले. आठवी ते नववीच्या गटातील इयत्ता नववी ‘अ’ व ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले, तर पाचवी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनीही समूहगीताद्वारे उपस्थितांची दाद मिळवली. ‘कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून कचरा व्यवस्थापनाबाबत सामाजिक जाणीव जागृती करण्यात आली.

हेही वाचा

राष्ट्रप्रेमाच्या रंगात रंगली गायत्री स्कूल; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रमुख पाहुणे किरण गाडे यांनी शाळेतील शिस्त व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सजग नागरिक म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, देशभक्तीची ज्योत मनामनात तेवत ठेवावी आणि नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आंतरवर्गीय निबंध, समूहगीत व कथाकथन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविलेल्या कुमार स्वरूप केशव शेळके यांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गुणवंत शिक्षक हनुमंत हुचगोळ, कुमारी भार्गवी शिंदे, पद्मश्री दगडे व भाग्यश्री पंडित यांना मेडल देऊन गौरविण्यात आले.

मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचे व शाळेचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ. प्राजक्ता भंडारे, माता पालक संघाच्या सहसचिव सौ. सारिका काटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवित झेंडे व पदाधिकारी, उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक पंकज देव व सौ. स्नेहल जाधव यांनी केले, तर आभार दिलीप कुमावत यांनी मानले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button