कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा सुरूच राहणार : कामगार नेते यशवंत भोसले
क्रांतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हजारो कामगारांचा एल्गार

पिंपरी-चिंचवड | ९ ऑगस्ट हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ‘क्रांती दिन’ म्हणून ओळखला जातो. ९ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात झाली. याच क्रांती दिनाचे औचित्य साधत कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संत तुकाराम नगर येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभामंडपात क्रांती दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचे लक्ष वेधत आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यशवंत भोसले म्हणाले की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी कामगारांच्या संरक्षणाचे कायदे अधिक मजबूत करावेत आणि कामगारांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळावेत, या मागणीसाठी पुणे येथील कामगार कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्यात आले होते. तब्बल १३ दिवस हे उपोषण सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी विविध माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आज कारखाने, आस्थापना, शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायमस्वरूपी कामगारांच्या जागी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जात आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात असल्याचे कागदोपत्री चित्र असले तरी अनेक ठिकाणी त्यांना कायदेशीर वेतन, विविध सवलती, सुरक्षेची साधने आणि साप्ताहिक सुट्टी यांसारखे मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मिळत नसल्याचा आरोप भोसले यांनी केला.

हेही वाचा
चाकण-तळेगावची वाहतूक होणार सुसाट!
कामगारांच्या हक्कांसाठी गेल्या २६ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात दाद मागत असल्याचे भोसले यांनी सांगितले. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे वेळ जात असून कामगारांना न्याय मिळण्यासाठी सातत्याने न्यायालयीन फेऱ्या माराव्या लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“संविधानाने कामगारांना दिलेले अधिकार प्रत्यक्षात मिळवून देण्यासाठी गेल्या तीन दशकांत अनेक मोर्चे, रस्त्यावरची आंदोलने आणि सात वेळा उपोषणे केली. मात्र, कायमस्वरूपी कामगारांची संख्या कमी होत असताना कंत्राटदार आणि कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सामान काम, सामान वेतन’ अधिकाराची पायमल्ली..
“कायमस्वरूपी कामगाराला ज्या कामासाठी सुमारे ४८ हजार रुपये मासिक वेतन मिळते, त्याच स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराला केवळ १५ ते १८ हजार रुपये दिले जातात. तेही महिन्याचे ३० दिवस काम केल्यानंतर,” हा कामगार बांधवांवरील अत्याचार आहे.अशी खंत यशवंत भोसले यांनी व्यक्त केली. समान कामासाठी समान वेतनाचा अधिकार कायद्यामध्ये असतानाही प्रत्यक्षात कामगारांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी..!
कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधान, न्यायव्यवस्था आणि सरकारवर आपला पूर्ण विश्वास आहे, असे सांगत भोसले यांनी सरकारने श्रमिक, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी कठोर आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा संघर्ष यापुढेही अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी क्रांती दिनाच्या मेळाव्यात उपस्थित हजारो कामगारांना दिली.





