Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

चाकण-तळेगावची वाहतूक होणार सुसाट!

पुणे-नाशिक महामार्गाला चार पर्यायी बाह्यवळण रस्त्यांची जोड; १०० कोटींच्या निधीतून प्रमुख जिल्हा मार्गांचा विकास

पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्त्वाची पावले उचलली आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चार पर्यायी बाह्यवळण रस्ते विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. यासोबतच प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासाची कामेही प्रगतिपथावर आहेत.

या रस्ते प्रकल्पांमुळे चाकण, तळेगाव आणि परिसरातील औद्योगिक वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक मुख्य चौकांमधून वळविल्याने चाकण चौक, तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

चार पर्यायी बाह्यवळण रस्ते

‘पीएमआरडीए’कडून चाकण आणि तळेगाव परिसरासाठी पूर्व बाह्यवळण मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून चार महत्त्वाचे रस्ते विकसित केले जाणार आहेत.

हिंगणे चौक ते खराबवाडी :
तळेगाव-चाकण महामार्गावरील हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा तीनमधील खराबवाडीला जोडणारा रस्ता तयार केला जाणार आहे. ९०० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंद असलेला हा रस्ता हिंगणे चौकाला फोक्सवॅगन कंपनी परिसराशी जोडणार आहे.

या मार्गामुळे तळेगाव तसेच चाकण एमआयडीसी टप्पा दोन आणि तीनमधून पुणे व नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक थेट पुणे-नाशिक महामार्गाशी जोडली जाणार आहे. परिणामी तळेगाव चौक आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंप :
नाणेकरवाडीतील सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंपादरम्यान १.२ किलोमीटर लांबीचा आणि १५ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. हा मार्ग तळेगाव तसेच चाकण एमआयडीसी टप्पा दोन आणि तीनला पुणे-नाशिक महामार्गाशी जोडणार आहे. त्यामुळे चाकणच्या मुख्य चौकावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

बंगला वस्ती चौक ते रासे फाटा :
मेदनकरवाडीतील बंगला वस्ती चौक ते रासे फाटा असा २.५ किलोमीटर लांबीचा आणि ३५ मीटर रुंद रस्ता प्रस्तावित आहे. हा मार्ग पुणे, तळेगाव आणि चाकण एमआयडीसी टप्पा दोन व तीनला पुणे-नाशिक महामार्गावरून शिक्रापूर राज्य मार्गावरील रासे फाट्याशी जोडणार आहे.

चाकण टप्पा पाचला जोडणारा मार्ग :
पश्चिम बाह्यवळण मार्गाअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गाला चाकण एमआयडीसी टप्पा पाचशी जोडणारा ८५० मीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. यामुळे चाकण चौक आणि आंबेठाण चौकातील अवजड वाहतूक अधिक वेगाने मार्गस्थ होण्यास मदत होणार आहे.

प्रमुख जिल्हा मार्गांचा विकास

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासाचे कामही हाती घेण्यात आले आहे.

  • चिखली ते मोई – १.६५ किलोमीटर
  • कुरूळी फाटा ते निघोजे – २.५ किलोमीटर
  • आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता – ४ किलोमीटर
  • चऱ्होली खुर्द ते आळंदी-मरकळ – २ किलोमीटर
  • निघोजे ते चाकण एमआयडीसी – १.२५ किलोमीटर
  • खालुंब्रे ते चाकण एमआयडीसी टप्पा दोन – १.७५ किलोमीटर

१०० कोटींच्या निधीची तरतूद

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या मार्गांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.

याशिवाय चार बाह्यवळण मार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच पुणे-नाशिक मार्गावरील प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे.

“चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी प्रमुख जिल्हा मार्गांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत. याचबरोबर चार बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीला गती मिळेल,” अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button