पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांना आकुर्डीतील शिक्षण संकुलात भावपूर्ण श्रद्धांजली
स्व. डी. वाय. पाटील यांचा शैक्षणिक व सामाजिक वारसा जपण्याचा संकल्प..

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने आणि सामाजिक बांधिलकीने अमिट ठसा उमटविणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी डी. वाय. पाटील शिक्षण संकुल, आकुर्डी आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. श्री. वाय. के. पाटील, डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. के. टी. जाधव, कर्नल एस. के. जोशी, सीएफओ शर्मा सर आणि प्रा. मनीष भल्ला यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना दादांसोबतच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना ‘मदतीचा हात’
दादांचे व्यक्तिमत्त्व केवळ शिक्षणमहर्षी म्हणून नव्हे, तर सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी जोडलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात होते. ‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे’ या विचारातून त्यांनी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
दादांनी रुजविलेल्या शिक्षण, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या मूल्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संकुल तसेच डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी परिवारातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे व्यक्तिमत्व..!
दादांची दूरदृष्टी, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि माणसे जोडण्याची विलक्षण क्षमता यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणसंस्था म्हणजे केवळ इमारती नसून हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्रे आहेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





