सुप्रिया सुळेंनी ८ खासदारांना सोबत घेतलं!
पंतप्रधान भेटीवर संजय राऊतांचा खुलासा; ‘मविआ’त संभ्रम नसल्याचा दावा, तर ‘मिंधे’ गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या पंतप्रधान भेटीपासून सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्ष, संसदेत विरोधकांची गळचेपी आणि ‘मिंधे’ गटाच्या भवितव्यापर्यंत विविध मुद्द्यांवर राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली.
‘मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अप्रत्यक्षपणे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
“गेल्या १६ दिवसांपासून संसदेत विरोधी पक्ष पंतप्रधान येण्याची मागणी करत आहेत, तिथे ते येत नाहीत. पण अपात्रतेचा खटला सुरू असलेल्या ६ फुटीर खासदारांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी ढोकळा, फाफडा आणि जिलेबी खायला घातली जाते. पंतप्रधानांच्या निवासाने जणू केटरिंग सेवा सुरू केली आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.
आमदार किंवा खासदार फुटले म्हणून मूळ पक्षाची मालकी फुटीर गटाकडे जात नाही, असा दावा करत राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती आणि आपण सर्वजण मूळ पक्षासोबत आहोत.
“संविधान आणि सर्वोच्च न्यायालय हे नरेंद्र मोदींपेक्षा मोठे आहेत. आम्हाला मेहेरबानी नको, निष्पक्ष न्यायाची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंच्या पंतप्रधान भेटीवर खुलासा
खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या चर्चांना राऊत यांनी पूर्णविराम दिला.
“माझे सुप्रियांशी बोलणे झाले आहे. महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया’ आघाडीत कोणताही संभ्रम नाही. कोणीही कुठे जात नाही आणि महाविकास आघाडी सोडत नाही,” असे राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री संसदेत उपस्थित राहत नसल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या दोन खासदारांच्या प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांनी इतर खासदारांचे प्रश्नही एकत्र केले आणि आठ खासदारांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेतल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असून राष्ट्रवादी काँग्रेस हा आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘मोदी-शाहांनी नेहरूंकडून शिकावे’
संसदेत विरोधी पक्षाचा सन्मान कसा राखावा आणि संसदीय लोकशाहीच्या परंपरा कशा जपाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संसदीय कार्याचा अभ्यास करावा, असा टोला राऊत यांनी लगावला.
गेल्या ७५ वर्षांत झाली नसेल, अशी लोकशाहीची विटंबना सध्या सुरू असल्याचा आरोप करत देशाचे पंतप्रधान संसदेत येण्याचे टाळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘मिंधे’ गट भाजपमध्ये विलीन होणार?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांबाबतही संजय राऊत यांनी मोठा दावा केला. हे दोन्ही पक्ष अमित शाह यांनी स्थापन केले असून या पक्षांची ‘मालकी’ही अमित शाह यांच्याकडे असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अपात्रतेच्या खटल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, संविधानातील नियमांनुसार ‘मिंधे’ गटाला लवकरच भारतीय जनता पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधान भेटीवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चांना राऊत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय उत्तर मिळाले आहे. त्याचवेळी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.





