सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; मध्यस्थीनंतर वातावरण शांत
सभासदांच्या आरोपांवरून कर्मचारी आणि सभासद आमनेसामने; ‘यंदा उच्चांकी भाव दिला, पुढील वर्षीही प्रयत्न करू’ – सुनेत्रा पवार

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या कारभारावरून काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभेदरम्यान एका सभासदाने कारखान्याच्या कामकाजाबाबत आरोप केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही सभासदही आक्रमक झाल्याने वातावरण तापले. कारखान्याच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मध्यस्थी करत सभासद आणि कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही सर्वसाधारण सभा पार पडली. सभासदांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची सकारात्मक दखल घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. “गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा उच्चांकी भाव देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. पुढील वर्षीही शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महसुली कार्यालयांसाठी हक्काच्या जागेचा मार्ग मोकळा!
‘अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार’
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहकारी साखर कारखान्यांच्या कारभाराचा प्रदीर्घ अनुभव होता. माळेगाव कारखाना मागे पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या कारखान्याची जबाबदारी स्वीकारली होती, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर आली असून हा कारखाना केवळ सहकारी संस्था नसून लोकचळवळ आहे, असे त्यांनी नमूद केले. “माळेगाव कारखाना देशात क्रमांक एकवर नेण्याचे अजितदादांचे स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवरून आपण पुढे जाणार आहोत,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी मार्च 2026 मध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन
यंदाचे वर्ष दुष्काळाचे असून बारामती तालुक्यातही दुष्काळ जाहीर झाला आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अशा परिस्थितीत शेतकरी आणि सभासदांनी एकजूट ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
माळेगाव कारखान्याच्या सभेतील गोंधळानंतर सुनेत्रा पवार यांनी केलेली मध्यस्थी आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातही चांगला भाव देण्याचे आश्वासन हे सभेतील प्रमुख मुद्दे ठरले.





