MPSC Exam: MPSCचा मोठा निर्णय! राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन; 2026ची परीक्षा पुढे ढकलली
3 ऑक्टोबरपासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026, स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब मुख्य परीक्षा लांबणीवर; सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांबाबत मोठे निर्णय जाहीर केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबर 2026पासून सुरू होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना यांनी आक्षेप नोंदवले होते. हे आक्षेप विचारात घेऊन संबंधित उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या परीक्षेची पुढील प्रक्रिया लांबण्याची शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील प्रचलित विविध परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीने राज्यभरातील परीक्षार्थी आणि संबंधित घटकांशी चर्चा करून तसेच विविध ठिकाणच्या उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास केला आहे. आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समितीच्या शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींनी 3 ऑक्टोबर 2026पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलण्याची मागणी आयोगाकडे केली होती. या सर्व बाबींचा विचार करून आयोगाने तीनही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – ‘महाराष्ट्र देशासाठी विकासाचा आदर्श निर्माण करेल’; प्रशासकीय क्षमता वाढविण्यावर फडणवीस यांचा भर
सुधारित परीक्षा तारखा कधी?
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2026 यांच्या सुधारित तारखांबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
MPSCच्या निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तात्काळ घेतला जाईल, अशी आशा असल्याचे त्यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मार्च 2026मध्ये पदाची शपथ घेतली आहे.




