Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘कोणासाठी सुरू आहे सगळं?’

मुंबई-गोवा महामार्गापासून ‘तिसऱ्या मुंबई’पर्यंत राज ठाकरेंचे सवाल; स्थानिकांनी जमीन न विकण्याचे केले आवाहन

रायगड : महाराष्ट्रातील विकासकामे, जमीनविक्री आणि कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांवरून राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे विकासकामांना अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच ‘दुसरी मुंबई’, ‘तिसरी मुंबई’ या संकल्पनांच्या माध्यमातून स्थानिकांच्या जमिनी आणि संसाधनांवर कोणाचा ताबा जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मुंबई-गोवा महामार्गासाठी गडकरींना कॉल केला…”

राज ठाकरे म्हणाले, “स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे विकासकामे मार्गी लागत नाहीत. मागे मी मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन केला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ‘कंत्राटदार वैतागून निघून गेले.’”

“नितीन गडकरी जर कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल असे बोलत असतील, तर ते कशामुळे कंटाळले? रस्ते बनवताना हेच प्रश्न वारंवार समोर येतात. पैसे गेले आणि कंत्राटही गेले!” असा टोला त्यांनी लगावला.

कोणतीही दूरदृष्टी न ठेवता केवळ टक्केवारी कशी मिळेल, यावरच व्यवहार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘दुसरी मुंबई, तिसरी मुंबई’वर सवाल

राज ठाकरे यांनी राज्यात जाहीर होत असलेल्या नव्या शहरांच्या प्रकल्पांवरही प्रश्न उपस्थित केले.

“सध्या राज्यभरात दुसरी मुंबई, तिसरी मुंबई असे प्रकल्प जाहीर केले जात आहेत. या तिसऱ्या मुंबईत नक्की काय येणार आहे? तर एज्युकेशनल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे! मात्र, इथे नक्की काय आणले जात आहे, याची स्पष्ट माहिती महाराष्ट्रातील जनतेला दिली जात नाही,” असे ते म्हणाले.

स्थानिक जमीनमालकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी पुण्याच्या सद्यस्थितीचाही दाखला दिला.

“आपल्याकडचा जो मूळ जमीनदार आहे, तो उद्या केवळ ‘माजी जमीन मालक’ म्हणूनच उरणार आहे. त्याच्या डोळ्यांसमोर तिसरी मुंबई उभी राहील. आज पुण्याची काय अवस्था झाली आहे ती सर्वांसमोर आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचेच काम सध्या सुरू आहे,” असा दावा त्यांनी केला.

“कोणासाठी सुरू आहे सगळं?”

महाराष्ट्रातील वाढत्या जमीनविक्रीवर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत भाष्य केले.

“जमीन विकणे हाच एकमेव धंदा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. विशेषतः कोकणात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या चालू आहे. आपली जमीन, आपले पाणी आणि आपली वीज… मग यावर पोसले कोण जाणार? तर बाहेरचे लोक!”

“जर महाराष्ट्राच्या हिताशी संबंधित प्रगतीच होत नसेल, तर काय चाटायची ती प्रगती? नक्की कोणासाठी हे सगळं सुरू आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ’ एवढाच विकास?

पालकमंत्री या संकल्पनेवरही राज ठाकरे यांनी टीका केली. “पालकमंत्री ही संकल्पना अत्यंत फालतू आहे. पालक म्हणजे आई-बाप, मग यांना आपण आई-बाप मानायचे का?” असा सवाल त्यांनी केला.

सरकारने निर्णय थेट घ्यायला हवेत, असे सांगताना आपल्या मुला-मुलींना भविष्यात कोणत्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होणार आहेत, याची माहितीच दिली जात नसल्याचे ते म्हणाले.

“१५ वर्षे झाली तरी कामे पूर्ण होत नाहीत; आजही तीच बिकट परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच सुरू आहे, कोणतेही नवीन विषय समोर येत नाहीत. ‘आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ’ एवढ्यापुरताच विकास सीमित ठेवला गेला आहे.”

“आमचा विकासाला विरोध नाही, पण माणसाला अंधारात ठेवू नका,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

“जमीन विकली की तुमचा विषय संपला”

स्थानिकांच्या अस्तित्वाचा संबंध त्यांच्या जमिनीशी असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी जमीन विक्रीबाबत गंभीर इशारा दिला.

“तुमचे अस्तित्व हे केवळ तुमच्या जमिनीवर टिकून आहे. एकदा जमीन विकली की तुमचा विषय तिथेच संपला,” असे ते म्हणाले.

कोकणाच्या भवितव्याचा सर्वांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी स्थानिकांना एकजूट होण्याचे आवाहन केले.

“सगळे एकत्र आले तर असा अन्याय होणार नाही. यासाठी सत्ताबदल आणि माणसे बदलणे अत्यंत गरजेचे आहे.”

निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना रस्त्यांची परिस्थिती किंवा स्थानिक प्रश्नांशी फारसे देणेघेणे नसल्याचा आरोप करत, जोपर्यंत त्यांना धक्के दिले जात नाहीत, तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक बदल घडणार नाही, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button