Breaking-newsपिंपरी / चिंचवड

हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची निर्घृण हत्या; तरुणी गंभीर जखमी

प्रेमसंबंधातील वादातून लोखंडी रॉडने हल्ला; सागर गायकवाडचा मृत्यू, निकिता दनाने गंभीर जखमी

पिंपरी : हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला असून निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- शरद पवार गटाचे सर्व खासदार PM मोदींच्या भेटीला..!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश झांबरे आणि निकिता दनाने यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. मात्र, निकिता पुढील शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली. कालांतराने सागर आणि निकिता यांच्यात जवळीक वाढली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे दिनेश आणि निकिता यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

या प्रेमसंबंधाच्या वादातून आरोपी दिनेश झांबरे संतप्त झाला होता. त्यानंतर त्याने हिंजवडी परिसरातील एका सात मजली पीजीमध्ये जाऊन निकिता आणि सागर यांच्यावर हल्ला केला. आरोपीने दोघांवर लोखंडी रॉडने सपासप वार केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

या हल्ल्यात सागर गायकवाड गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सागरला मृत घोषित केले. या हल्ल्यात निकिता दनाने हिलाही गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत आरोपी दिनेश झांबरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत प्रेमसंबंधातील वाद आणि मत्सरातून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वस्तू आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामागील नेमकी कारणे, आरोपीचा पूर्वनियोजित हेतू होता का आणि घटनेपूर्वी आरोपी व पीडितांमध्ये काही वाद झाला होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंजवडी परिसरात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी शिक्षण आणि नोकरीसाठी वास्तव्यास असतात. त्यामुळे पीजीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जखमी निकिताची प्रकृती आणि तिच्याकडून मिळणारी माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button