रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, प्रवाशांचा खोळंबा होणार
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; काही लोकलच्या मार्गात बदल, तर काही फेऱ्या पूर्णपणे रद्द

मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी (९ ऑगस्ट) मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लोकलच्या मार्गात बदल करून त्या जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा- हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची निर्घृण हत्या; तरुणी गंभीर जखमी
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.०५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकलना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
तसेच ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंड स्थानकापर्यंत जलद मार्गावरून चालविण्यात येतील. त्यामुळे या मार्गावरील नियमित प्रवाशांना प्रवास करताना अतिरिक्त वेळ लागू शकतो.
हार्बर रेल्वेवरही मोठा ब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत सीएसएमटी-वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे-गोरेगाव-सीएसएमटी या मार्गावरील काही लोकल सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या काही अप लोकल सेवांवरही परिणाम होणार आहे.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी उपलब्ध पर्यायी सेवांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव-वांद्रे मार्गावर ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर गोरेगाव-वांद्रे दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी तसेच सीएसएमटी/पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी/पनवेल या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
याशिवाय चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या काही धीम्या लोकल फेऱ्यांवरही परिणाम होणार असून काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
माटुंगा-कुर्लादरम्यान चारही मार्ग बंद
दरम्यान, सायन रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटी-कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामांतर्गत माटुंगा-कुर्ला स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या तसेच जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री १०.४० वाजता सुटणारी बदलापूर-परेल, रात्री १०.१५ वाजता सुटणारी खोपोली-सीएसएमटी आणि रात्री ११.२९ वाजता सुटणारी बदलापूर-सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकातच समाप्त करण्यात येणार आहेत.
तसेच रविवारी पहाटे ४.१९ वाजता सुटणारी कसारा लोकल सीएसएमटीऐवजी ठाणे स्थानकातून चालविण्यात येणार आहे.
शनिवारी चार लोकल फेऱ्या रद्द
८ आणि ९ ऑगस्टच्या मध्यरात्री रात्री १२.४० ते पहाटे ४.४० या कालावधीत आणखी एक विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या काही रात्रीच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये रात्री १२.१२ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत, रात्री १२.२४ वाजता सुटणारी सीएसएमटी-ठाणे, पहाटे २.३० वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी आणि पहाटे ४.०४ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी या चार लोकलचा समावेश आहे.
त्यामुळे शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक आहे. मेगाब्लॉकमुळे काही मार्गांवर लोकल सेवा उशिराने धावण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी शक्यतो अतिरिक्त वेळ हाताशी ठेवून घराबाहेर पडावे.





