Breaking-newsराजकारण

शरद पवार गटाचे सर्व खासदार PM मोदींच्या भेटीला..!

शरद पवार गटाच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती; सदिच्छा आणि विकासकामांच्या चर्चेसाठी भेट असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सर्व खासदार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खासदारांकडून पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागण्यात आला असून, ही भेट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-   नंदुरबारमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक पर्दाफाश..!

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांचाही समावेश होता. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संबंधित खासदारांना धीर देत ‘घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे’, असा विश्वास दिल्याचे सांगितले जात होते.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. एका खासदाराने ही केवळ सदिच्छा भेट असणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मतदारसंघातील विकासकामे आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी भेट होण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीसाठी खासदारांकडून वेळ मागण्यात आला आहे. मात्र, भेटीची अधिकृत तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.

ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे शरद पवार गटाच्या खासदारांची मोदींसोबत होणारी ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

डिलीमिटेशनच्या पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची?

केंद्र सरकारकडून डिलीमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील विधेयकाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या खासदारांमध्येही बैठका आणि चर्चांना वेग आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात होणाऱ्या चर्चेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

तसेच महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात येण्याची शक्यता आहे. या निकालाचा परिणाम संबंधित सर्व पक्षांवर होऊ शकतो, असे न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि शरद पवार गटाच्या खासदारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भविष्यात पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, याबाबत यापूर्वीही अनेकदा तर्क-वितर्क झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आणि त्यातून कोणते राजकीय संकेत मिळतात, हे भेटीनंतरच स्पष्ट होणार आहे.

सध्या तरी शरद पवार गटाकडून ही भेट सदिच्छा आणि विकासकामांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर शरद पवार गटाची अधिकृत भूमिका काय राहते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे कोणते पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button