नंदुरबारमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक पर्दाफाश..!
पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुले आणि युवकांना लक्ष्य केल्याचा पोलिसांचा आरोप; मोबाईलमधील गुप्त फोल्डरमध्ये आढळले व्हिडिओ आणि छायाचित्रे

नंदुरबार : नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुले आणि युवकांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ व छायाचित्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी २२ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्या मोबाईलमधून सुमारे ३०० हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि छायाचित्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईनंतर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- रात्री १२:४६ वाजता ऋषभ पंतची ‘X’ पोस्ट; मागितली ‘भेटवस्तू’, मुख्यमंत्री धामींचा मोठा निर्णय!
जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाचा तपास सुरू करत संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. प्राथमिक तपासात संशयित तरुण २०२२ पासून अल्पवयीन मुले तसेच समवयस्क युवकांना लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. पैशांचे आमिष दाखवून तसेच ओळख आणि सलगी वाढवून तो पीडितांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या गैरकृत्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे संशयित आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवत असल्याचे तपासात समोर आले. तसेच हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितांवर दबाव आणला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
काही दिवसांपूर्वी संशयिताच्या गैरकृत्यांबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरालगतच्या भोणे फाटा परिसरातील एका शेतात संशयित एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आणि संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले.
पोलिसांनी योग्य संधी साधत घटनास्थळी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची ओळख चेतन प्रकाश कोळी (वय २२, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) अशी पटली. त्यानंतर त्याला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मोबाईल तपासणीत धक्कादायक डिजिटल पुरावे
संशयिताच्या मोबाईलची पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत कायदेशीर पद्धतीने तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोबाईलमधील एका गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन मुले आणि युवकांशी संबंधित लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली.
फॉरेन्सिक पथकाने संबंधित डिजिटल पुरावे वैज्ञानिक पद्धतीने जतन केले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोबाईलमधून सुमारे ३०० हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि छायाचित्रे मिळाली आहेत. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच संशयिताने आणखी किती जणांना लक्ष्य केले, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का आणि संबंधित डिजिटल सामग्रीचा वापर कशासाठी करण्यात आला, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे यांनी सरकारतर्फे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून विविध बाजूंनी सुरू आहे. संशयिताच्या मोबाईलमधून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांचा फॉरेन्सिक तपास केला जात असून, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचीही माहिती घेतली जात आहे. तसेच आणखी पीडित किंवा या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.
विशेष पोलीस पथकाची कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेकॉ. जगदीश पाटील, पोकॉ. रुपेश पगारे, राजेंद्र कटक, अमित भरवाड, आनंदा मराठे आणि महिला पोलीस कर्मचारी निवा वाघमोडे यांचा सहभाग होता.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





