Breaking-newsक्रिडा

रात्री १२:४६ वाजता ऋषभ पंतची ‘X’ पोस्ट; मागितली ‘भेटवस्तू’, मुख्यमंत्री धामींचा मोठा निर्णय!

उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्यासाठी पंतला हवी जमीन; मुख्यमंत्र्यांना थेट केली मागणी!

Rishabh Pant X Post : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे किंवा मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर सोशल मीडियावर केलेल्या एका वेगळ्या मागणीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे पंतने जमीन मिळवून देण्याची मागणी केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल राज्य सरकारने भेटवस्तू म्हणून जमीन द्यावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा-   पिंपरी-चिंचवड भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे; पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडणार!

ऋषभ पंतने शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ४६ मिनिटांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने दिल्लीहून आपल्या मूळ राज्यात म्हणजेच उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पोस्टमधील इंग्रजी भाषेतील काही व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुका चाहत्यांच्या लगेच लक्षात आल्या. त्यामुळे पंतची पोस्ट व्हायरल होण्यासोबतच त्यावर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

ऋषभ पंतला उत्तराखंडमध्ये स्थायिक व्हायचे आहे

ऋषभ पंतचा जन्म उत्तराखंडमधील रुडकी येथे झाला आहे. उत्तराखंडशी त्याचे विशेष नाते असून, अनेकदा त्याने आपल्या मूळ राज्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. आता दिल्लीहून उत्तराखंडमध्ये स्थलांतरित होऊन तेथेच स्थायिक होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

पंतने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग करत जमीन खरेदी करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. उत्तराखंडमध्ये राहण्यासाठी योग्य आणि मोठी जागा शोधत असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. आपल्या मातृभूमीवर मनापासून प्रेम असल्याचे सांगत त्याने मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली.

पंतने नेमकी काय मागणी केली?

ऋषभ पंतने आपल्या पोस्टमधून उत्तराखंडमध्ये जमीन मिळवून देण्याची मागणी केली. दिल्लीहून उत्तराखंडमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, आपल्या गरजेनुसार योग्य आणि मोठी जागा मिळत नसल्याचेही त्याने नमूद केले.

त्यानंतर दुसऱ्या पोस्टमध्ये पंतने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल राज्य सरकारकडून भेटवस्तू म्हणून जमीन देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तसे शक्य नसेल तर सरकारी दराने जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही त्याने केली.

पोस्टमधील इंग्रजीच्या चुकांवर चाहत्यांनी घेतली फिरकी

ऋषभ पंतच्या मध्यरात्रीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही चाहत्यांनी त्याच्या मागणीचे समर्थन केले, तर काहींनी पोस्टमधील इंग्रजी व्याकरण आणि स्पेलिंगच्या चुकांकडे लक्ष वेधले.

काही चाहत्यांनी पंतने मध्यरात्रीच्या वेळी पोस्ट का केली, असा सवाल केला. तर काहींनी त्याच्या पोस्टमधील भाषेची मजेशीर पद्धतीने खिल्ली उडवली. पोस्ट करण्याची वेळ आणि त्यातील चुका यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींचे पंतला आश्वासन

ऋषभ पंतच्या पोस्टवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पंत हा उत्तराखंडचा अभिमान असल्याचे सांगत धामी यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

पंतने आपल्या उत्कृष्ट क्रिकेट कामगिरीच्या माध्यमातून देवभूमी उत्तराखंडचे नाव देशासह जगभरात उज्ज्वल केले आहे. मातृभूमीवरील त्याचे प्रेम आणि पुन्हा उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

पंतने उपस्थित केलेल्या जमीन खरेदीच्या मुद्द्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले. संबंधित अधिकारी लवकरच ऋषभ पंतशी संपर्क साधतील आणि नियमानुसार शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, ऋषभ पंतच्या क्रिकेट कारकिर्दीबाबतही सध्या चर्चा सुरू आहे. आगामी श्रीलंका मालिकेसाठी त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. तसेच आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सकडून १५ कोटी रुपयांच्या करारासह दिल्ली कॅपिटल्स संघात पुन्हा घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button