जाधवाडीतील वडाचा मळा ते बोलाई मळा रस्ता समस्यांच्या विळख्यात!
गटारी तुंबल्या, रस्त्यावर खड्डे; पथदिव्यांचीही बोंबाबोंब — तीन महिन्यांपासून काम ठप्प

निधी आणि ठेकेदार नसल्याचे अधिकाऱ्यांचे कारण; विशाल आहेर यांचा महापालिका प्रशासनावर सवाल
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जाधवाडी परिसरातील वडाचा मळा ते बोलाई मळा या मार्गावर नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील गटारी वारंवार तुंबत असून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच पथदिव्यांची व्यवस्था अपुरी असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्यांबाबत वारंवार महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल आहेर यांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरातील परिस्थिती जैसे थे असून नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वडाचा मळा ते बोलाई मळा परिसरात गटारी वारंवार तुंबत असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. नियमित साफसफाई आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आहेर यांनी सांगितले.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
या भागातील रस्त्याची अवस्था देखील खराब झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ते दिसून येत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांसाठीही हा मार्ग धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील पथदिव्यांची अवस्था देखील बिकट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘निधी नाही, ठेकेदार नाही’; प्रशासनाचे उत्तर
या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ‘निधी उपलब्ध नाही आणि ठेकेदारही उपलब्ध नाही’, असे उत्तर दिले जात असल्याचा दावा विशाल आहेर यांनी केला. मात्र, नागरिकांकडून महापालिकेला नियमित कर मिळत असताना मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी आणि यंत्रणा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या तीन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे ठोस काम झालेले नाही, त्यामुळे प्रशासन नेमके कोणत्या कारणामुळे कामाला विलंब करीत आहे, असा सवालही आहेर यांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका
महापालिका प्रशासनाने जाधवाडीतील वडाचा मळा ते बोलाई मळा परिसरातील समस्या तातडीने सोडवाव्यात. गटारींची नियमित साफसफाई, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती आणि बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी विशाल आहेर यांनी केली आहे. ‘‘नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने त्यांचा संयम पाहू नये. निधी आणि ठेकेदार उपलब्ध नसल्याचे कारण सांगून तीन महिने काम रखडवणे योग्य नाही. महापालिकेने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा,’’ अशी भूमिका विशाल आहेर यांनी व्यक्त केली.





