ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समितीची स्थापना

नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

महापालिका सर्वसाधारण सभेत विषयाला सर्वानुमते मंजुरी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समितीच्या स्थापनेच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या समितीच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शहर सुधारणा समिती सदस्य तथा भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आरोग्य विषयक प्रश्नांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी स्वतंत्र समितीची आवश्यकता असल्याची भूमिका डॉ. सुहास कांबळे यांनी सातत्याने मांडली होती. त्यासाठी त्यांनी महापालिका प्रशासन तसेच सभागृहात वारंवार पाठपुरावा केला होता.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३० (१) अंतर्गत विशेष समिती स्थापन करण्यास यापूर्वी तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर समितीचे कामकाजाचे क्षेत्र, अधिकार व कर्तव्ये निश्चित करणारा विषय नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. सभागृहाने या विषयाला मंजुरी दिल्याने आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समितीची अधिकृत स्थापना झाली आहे.

हेही वाचा

पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुहास कांबळे यांनी शहरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सेवांवरील वाढता ताण लक्षात घेऊन स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समितीची गरज सातत्याने अधोरेखित केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर समितीच्या स्थापनेला अंतिम मंजुरी मिळाल्याने आरोग्य क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

विशेष म्हणजे या समितीला ₹१० लाखांपेक्षा अधिक आणि ₹५० लाखांपर्यंतच्या खर्चाच्या प्रशासकीय मान्यता प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तर ₹५० लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रस्तावांबाबत महापालिका सभेकडे शिफारस करण्याचे अधिकारही समितीकडे असणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील विकासकामे, वैद्यकीय सुविधा आणि नागरिकांशी संबंधित निर्णय अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

या समितीच्या माध्यमातून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास गती मिळणार आहे. शहरातील महापालिका रुग्णालये, दवाखाने, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, संसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य अभियानाची अंमलबजावणी, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, दवाखाना व रुग्णालय नोंदणी, पीसीपीएनडीटी कायदा, वैद्यकीय गर्भपात कायदा, सार्वजनिक आरोग्य विषयक विविध बाबी तसेच पशुसंवर्धन विभागाशी संबंधित आरोग्यविषयक कामकाज या समितीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.

“पिंपरी-चिंचवड हे वेगाने विस्तारत असलेले शहर आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्थाही अधिक सक्षम आणि गतिमान होणे आवश्यक होते. त्यामुळे स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समितीची स्थापना व्हावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. आज या विषयाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्याचा आनंद आहे. या समितीच्या माध्यमातून महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आदी विषयांवर अधिक परिणामकारक निर्णय घेता येतील. नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या समितीचा प्रमुख उद्देश असेल.”

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button