कर्जमाफीच्या लाभासाठी हे काम करणे आवश्यक, नाहीतर मिळणार नाही लाभ

नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतच कर्ज माफ करण्यात येणार आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी शासनाकडून काही अटी घालण्यात आल्यात. त्या पूर्ण करणाऱ्यांनाच याच लाभ मिळणार आहे. तर पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काही काम करणे बंधनकारक केले आहे. हे काम केल्यावरच त्यांना माफीचा लाभ मिळेल.
दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी
गेल्या काही वर्षात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते. रस्ता रोकोही केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्याचे जाहीर केले होते. कर्जमाफीचे निकष व रक्कम ठरवण्यासंदर्भात मुख्य सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने शासनाला अहवाल दिला. त्यानंतर दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. व्याजासह दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. दोन लाखांवरील रक्कम एकमुश्त भरल्यावरच याचा लाभ मिळेल. त्याच प्रमाणे सरकारने लोकप्रतिनिधी, कर भरणारे अधिकारी, व्यापारी यांनाही याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – राज्यातील १७५ कोल्हापुरी बंधारे तातडीने दुरुस्त करण्यावर भर
कर्जमाफीच्या लाभासाठी हे काम करावे लागणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ३८ हजारांवर शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठवण्यात आली होती. कर्जमाफीसाठी शासनाकडून काही अटी घालण्यात आल्या असून ते पूर्ण करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. यादी तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत चावडीवर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांमध्ये लावण्यात येणार आहे. यादीत नाव असलेले शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे. या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे. आधार प्रमाणिकरण न केल्यास लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येते.





