Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी आरोग्यसेवांची नवी मानके; नागरिकांना मिळणार दर्जेदार आणि सुलभ उपचार

ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या आणि मनुष्यबळाची स्पष्ट रूपरेषा; शासन निर्णय जारी

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

या निर्णयामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सुसूत्र आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार योग्य आरोग्य संस्थेची निवड करणे सुलभ होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.

ग्रामीण रुग्णालयापासून ३०, ५० आणि १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांसह सामान्य व जिल्हा रुग्णालयांपर्यंत विविध स्तरांवरील सेवांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णालयाची क्षमता आणि सेवा स्तर लक्षात घेऊन तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, नर्सिंग, अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळ, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी आणि इतर रुग्णसेवांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा –  कोल्हापुरात महसूलमंत्र्यांचा जनसंवाद; हजाराहून अधिक नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार

फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि दंतशल्यचिकित्सक आदी तज्ज्ञ सेवांचा रुग्णालयाच्या स्तरानुसार समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक आवश्यक उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होऊन रुग्णांना दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

निदानात्मक सेवांसाठीही स्पष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६, १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११०, तर जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे.

रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्य तपासण्या, लिपिड प्रोफाइल, HbA1C, थायरॉईड, पॅप स्मिअर तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासण्यांचा यामध्ये समावेश आहे.

रुग्णालयाच्या स्तरानुसार एक्स-रे आणि सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन, तर जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय सुविधेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे गंभीर आजारांचे निदान अधिक वेगाने आणि अचूकपणे करण्यास मदत होणार आहे.

गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षित नर्सिंग आणि पॅरामेडिकल मनुष्यबळाचेही रुग्णालयनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढीतील मनुष्यबळ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य संस्थांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, १,५१९ स्पेशालिस्ट, २,९१९ वैद्यकीय अधिकारी, ३,००५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११,५७१ स्टाफ नर्स यांचा समावेश आहे.

रुग्णालयाच्या स्तरानुसार अत्यावश्यक औषधांची यादी आणि आवश्यक औषधसाठ्याचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. तसेच रक्तपेढी व रक्त संक्रमण केंद्र, डायलिसिस, आयुष सेवा, लसीकरण कक्ष, माता-बाल आरोग्य सेवा आणि प्रसूती कक्ष यांसारख्या सुविधांचाही मानकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रुग्णवाहिका, दिव्यांग प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, डिस्चार्ज प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, आहार सुविधा आणि तक्रार निवारण व्यवस्था यांसारख्या नागरिकाभिमुख सेवांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

“नागरिकाला कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील आणि कोणत्या तपासण्या व सुविधा मिळतील, याची स्पष्ट माहिती उपलब्ध झाल्याने शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल,” असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button