Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

गांधींचा विचार वाचवला पाहिजे; शरद पवार

डॉ. कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेण्याचे काम केले : शरद पवार

पुणे | ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ ची जबाबदारी कुमारने आपल्या खांद्यावर घेतली आणि गांधी विचार नव्या पिढीत प्रसृत कसा होईल ह्याची खबरदारी त्यांनी घेतली. आज त्या संस्था जपल्या पाहिजेत. कारण त्या संस्था नाहीत, विचारधारा आहेत. महात्मा गांधीजींचा विचार जतन करणं, तो वाढेल ह्याची काळजी घेणं हे व्रत म्हणून कुमारने स्वीकारलं होतं. तुमची-माझी जबाबदारी आहे. विचाराने प्रामाणिकपणाने काम करणारे संस्थेचे जे घटक आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बालगंधर्व येथे रविवारी सकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. कबीर उमा कुमार, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन व्यासपीठावर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अॅड. अंकुश काकडे यांनी सुत्रसंचलन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडे एक चित्र पुण्यामध्ये बघायला मिळतं की, ज्या अनेक संस्था अनेक मान्यवरांनी पुण्यात उभ्या केल्या त्या संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणारा एक वर्ग आहे त्या वर्गापासून कमीतकमी गांधींचा विचार हा वाचवला पाहिजे. ही जी भूमिका कुमारची होती, त्या भूमिकेला आपण सर्वांनी जे कुणी काम करत असतील त्यांना साथ देणं हीच कुमारसाठी श्रद्धांजली आहे.

पवार पुढे म्हणाले की, कुमारचा आग्रह असायचा की, दुष्काळी भागातील शेतकरी, तरुण-तरुणी पिढीला मदत करता येईल असं धोरण सरकारने आखावं. तसा आग्रहच कुमारने विधिमंडळात आणि सत्ताधारी पक्षाकडे सातत्याने मांडला. एक काम करणारा, नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवणारा, महात्मा गांधींचा विचार जतन केला पाहिजे हे सूत्र घेऊन कष्ट करणारा एक मोठा नेता म्हणून आपण कुमारला पाहतो. आज ते आपल्यात नाहीत. पण तो विचार आहे, त्यांनी केलेलं काम आहे ते आपण अखंडपणे जपूया.

लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले की, विचार करणारे नेतृत्व करत नाहीत आणि नेतृत्व करणारे विचार करत नाहीत. विचार न करणे हीच आता नेतृत्वाची पूर्व अट झाली आहे. अशा वेळी हे दोन्ही एकत्र असणारे असे डॉ. सप्तर्षी होते. माझ्या विचारांची जडण घडण डॉ. कुमार सप्तर्षी आणि कुमार केतकर यांच्यामुळे घडली. एखाद्या विषयाकडे माणूस किती अंगाने पाहू शकतो हे त्यांच्या सहवासातून समजले. शेती, माती कळते त्यांना महानगरी कळत नाही. पण सप्तर्षी यांना शेती, महानगरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याची चांगली समज होती. त्यांनी गांधी आणि आंबेडकर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. तो सगळ्यात महत्वाचा आहे. आंबेडकरवाद्यांना गांधी समजत नाही. आणि गांधी वाद्यांना आंबेडकर कळत नाही. अशावेळी गांधी अधिक आंबेडकर अधिक नेहरु असे सुत्र सप्तर्षींनी मांडले. काही लोकांचे महत्व प्रभावातून, काहींचे दबावातून कळते तर सप्तर्षींसारख्यांचे महत्व काहींचे अभावातून कळते.

हेही वाचा

पवना धरण ९७% भरले! नदीपात्रात विसर्ग वाढवला; ७,५०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

अशोक वानखेडे म्हणाले की, गांधीला पुजताना लोक पाहिले पण गांधींचे विचार आत्मसात करणारे लोक कमी होत चालले आहेत. पुणे हे बिल्डरांचे शहर मानले जाते. आणि जेथे जमिन तेथे बिल्डरांचा डोळा असतो. अशावेळी आमची जबाबदारी आहे की, गांधी भवन ची गरीमा आहे ती राखली जावी. सप्तर्षी यांची आजच्या काळात जास्त गरज होती.

युवकांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा संदर्भ देत वानखेडे म्हणाले की, युवकांनी चिर युवा असलेल्या सप्तर्षींना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. या क्षणिक विजयाने जास्त उत्साहीत होण्याची गरज मला वाटत नाही. मी हा विजय मानत नाही. हे आंदोलन विषय आधारित होते. अण्णा आंदोलन सारखे या आंदोलनाचे होणार नाही ना याची भिती वाटते. युवांची उर्जा हवी आहे. पण त्याबरोबर विचार हवा. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक चिर युवा पाहिजे. जो सप्तर्षी यांच्या रुपात दिसत होता. ते आमच्यात नाही. ही मोठी कमी मला जाणवते. श्रध्दांजलीच्या रुपातून हा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांनी जर प्रयत्न केले तर ती खरी श्रध्दांजली होईल.

डॉक्टरांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असे सांगून राजन अन्वर म्हणाले की, वेळेअभावी सर्वांना श्रद्धांजली वाहता आली नाही. मात्र सत्याग्रही विचारधारा अंकात श्रद्धांजली लेख प्रसिद्ध करण्यात येतील. युक्रांदचे विसर्जन डॉक्टरांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा युक्रांद सुरु केले. अभिजीत दिपके शी संपर्क साधून येरवडा विद्यापीठाचे दिवस हे पुस्तक दिले. उर्मिला सप्तर्षी या सुद्धा डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे डॉक्टर प्रभावीपणे काम करू शकले.

डॉक्टर कबीर उमा कुमार यांनी आपल्या कौटुंबिक आठवणी सांगत म्हणाले की, मला आडनाव का नाही. कबीर उमा कुमार हे नाव का? असे विचारले तेव्हा बाबा म्हणाले, मुलांच्या जडणघडणीत आई बाबा यांचे योगदान असते. भारतीय ही आपली ओळख. आपल्याला जात, धर्म अशी ओळख नको. धर्म कोणता लावायचा असे विचारले तेव्हा ते म्हणाले की, मानवता. त्यांनी सांगितले की, तु जेव्हा १८ वर्षाचा होशील, तेव्हा जर तुला हे नाव व धर्म बदलायचा असेल तर तसा निर्णय तु घेवू शकतोस. मला मुलगा झाला तेव्हा माझ्या मुलाचे नावापुढे देखील आडनाव लावले नाही. रेहान दिप्ती कबीर असे नाव ठेवले. महाराष्ट्रातील राजकीय पर्वाची १८ जुलै ला अखेर झाली. विचाराने ते आजही जिवंत आहेत. त्यांनी लावलेला लोकशाही चा दिवा चालू ठेवू. हीच त्यांना योग्य श्रद्धांजली होईल.

कॉ. अजित अभ्यंकर यांनी आंदोलनातील आठवणी सांगत म्हणाले की, चातुवर्णाचे समर्थन केल्यावर शंकराचार्यांना उघडपणे आव्हान देऊन धर्म ग्रंथांच्या आधारे सप्तर्षींनी जो प्रतिवाद केला, ती आठवण आम्ही विसरु शकत नाही. आजच्या काळात हे शक्य नाही. युक्रांदचे संस्थापक असलेले डॉक्टर युवकांचा सर्वात मोठा विजय पाहायला नाहीत याची खंत वाटते.

दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर, सुभाष वारे, उल्हास पवार, शिवाजीराव कदम,सुर्यकांत पाठक, उपमहापौर परशुराम‌‌‌ वाडेकर, आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत,शिवसेना उबाठाचे गजानन थरकुडे, अॅड. एस. के जैन आदींनी श्रध्दांजली वाहीली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button