पुणे घाट प्रदेशात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भावर पुढील तीन दिवस वादळी पावसाचा प्रभाव

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यावर असणारा वादळी पावसाचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरीही उत्तर कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात काही भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. या प्रदेशात शनिवारीही पावसाची नोंद झाली तर उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होता. दरम्यान, रविवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज असून पुणे घाट प्रदेशात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तसेच विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर काहीसा कमी होत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच शनिवारी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे दक्षिण कोकणातही पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा – ‘मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार’; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
देशात सध्या विविध हवामान प्रणाली सक्रिय असून त्यांच्या प्रभावामुळे देशातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात मंगळावारपासून पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, रविवारी संपूर्ण विदर्भासह ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट प्रदेशात वादळी पावसाचा अंदाज असून नाशिक, धुळे, नंदुबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना आदी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.





