Guru Purnima 2025 | गुरूपौर्णिमा का साजरी केली जाते? वाचा त्यामागील ‘ही’ पौराणिक कथा

Guru Purnima 2025 | संपूर्ण भारतात गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे. गुरूपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. गुरूपौर्णिमेला ‘आषाढ पौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून ही ओळखले जाते. यंदाची गुरूपौर्णिमा ही 10 जुलै म्हणजेच आज साजरी केली जात आहे. हिंदू धर्मामध्ये गुरूला देवासमान दर्जा देण्यात आला आहे. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ शिक्षकच नव्हे, तर आई-वडील, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे. या शुभ दिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते. गुरूपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे. कारण, याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गुरूच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे, वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे. ही परंपरा आजतागायत पाळली जात आहे. महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण १८ पुराणांची रचना केली होती.
हेही वाचा : पंच्यात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे; सरसंघचालक मोहन भागवत यांचे सूचक वक्तव्य
गुरूपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की, आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. असे म्हटले जाते की, वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली. मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला.
तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल, तेव्हाच परत या असे ही सांगितले. त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली. त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. यानंतरच त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. तसेच, महाभारतासह, ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना केली. महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच, या दिवशी गुरूची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे.





