TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज जरांगेंचा शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला विरोध; ‘मेळावा रद्द करा, अन्यथा परभणीत येईन’

खासदार संजय जाधव यांना जरांगेंचा इशारा; एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा रद्द करण्याची मागणी, ५० वाहनांचा ताफा आंदोलनस्थळी दाखल

परभणी : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, परभणीत आज आयोजित करण्यात आलेल्या शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र विरोध केला असून, मेळावा रद्द न केल्यास आंदोलनस्थळ सोडून मराठा बांधवांसह परभणीत येण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी कार्यक्रमाला विरोध करत संजय जाधव यांना फोनवरून स्पष्ट इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.

कार्यक्रम रद्द करा, अन्यथा परभणीत येईन’

मनोज जरांगे यांनी संजय जाधव यांना फोन करून शेतकरी मेळाव्यात एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याने कार्यक्रम घेऊ नका, असे सांगितले. कार्यक्रम रद्द न केल्यास आपण आंदोलनस्थळ सोडून मराठा बांधवांना सोबत घेऊन परभणीत येऊ, असा इशारा त्यांनी दिला.

‘यानंतर जे काही नुकसान होईल, त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल,’ अशा शब्दांत जरांगे यांनी जाधव यांना सुनावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर परभणीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  रशियाचा कीवजवळील शस्त्रागारावर ड्रोन हल्ला; भीषण स्फोटांत 37 जणांचा मृत्यू, 130 घरांचे नुकसान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी यावेळीही सरकारवर टीका केली. ‘संजय शिरसाट मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करत आहेत आणि मराठ्यांच्या जीवावर उड्या मारण्यासाठी कार्यक्रम घेणार का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कार्यक्रम रद्द करण्याचा आग्रह धरताना, ‘कार्यक्रम रद्द करा, अन्यथा गोंधळ अटळ आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला. तसेच संजय शिरसाट यांनी रद्द केलेले प्रमाणपत्र परत द्या आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना सांगा, असेही त्यांनी संजय जाधव यांना सुनावले.

५० वाहनांचा ताफा आंदोलनस्थळी

दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाहने तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आंदोलनस्थळी सुमारे ५० वाहनांचा ताफा दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जरांगे यांनी परभणीत येण्याचा निर्णय घेतल्यास परिस्थिती काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, परभणीत शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मोठी तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचीही तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर हा मेळावा नियोजित वेळेनुसार होणार की रद्द केला जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता खासदार संजय जाधव आणि शिंदे गटाकडून याप्रकरणी कोणता निर्णय घेतला जातो, तसेच मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button