ठाकरे बंधूंची भूमिका ‘सेम’, हे तर पुतना मावशीचे प्रेम !
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला मिळत आहे प्रतिसाद, काँग्रेस, शरद पवार गटही होणार सामील !

मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आयोजित केलेल्या दि. ५ जुलैच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अन्य नेते आता आक्रमक झाले असून महाराष्ट्रामध्ये ‘मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही’ असे ठणकावून सांगत आहेत. ठाकरे बंधूंचे मराठी प्रेम, हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
शरद पवार यांचे आदेश..
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मराठीसाठीच्या एल्गार मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गट सहभागी होणार असल्याचे स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केले. तर ‘महाविकास आघाडी’ मधील काँग्रेस देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असाच होईल आणि सरकारला हिंदी सक्ती मागे घेण्यास भाग पाडेल, असे उबाठा गट आणि मनसे च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका..
दरम्यान, महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होत आहे, असा आरोप करत उबाठा गट आणि मनसे यांनी पक्षविरहित मोर्चाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा दिला होता. आता सत्ता नसताना विरोधात बसल्यावर ते विरोध करत आहेत, हे काही त्यांचे मराठी प्रेम नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
हिंदी हा तर पर्यायी विषय !
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही. हिंदी पर्यायी विषय आहे. हिंदी किंवा कोणतीही भाषा शिकता येईल, असा पर्याय दिला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र आहे, ते आपण स्वीकारले आहे. ‘एनईपी-२०२०’ हे धोरण आले, त्यावेळी महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’ चे म्हणजेच उद्धव ठाकरेंचे सरकार होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारने यावर अभ्यास करुन नीती ठरवण्यासाठी एक समिती नेमली.
समितीच्या अध्यक्षपदी डॉ. माशेलकर..
या समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर होते. डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात अशा ज्येष्ठ तज्ज्ञांसह १८ सदस्य समितीमध्ये होते. या समितीने एक अहवाल तयार केला आणि तो उद्धव ठाकरेंच्या सरकारला २०२१ मध्ये दिला. २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारने तो अहवाल स्वीकारला. त्यानंतर पुढील कारवाई झाली. या अहवालात तीन भाषा सूत्र सांगितले आहे. मराठीसोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा. हे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये झाले आहे. उद्धव ठाकरेंनी हे सांगितले आहे, की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. आता असा अहवाल आहे. डॉ. मुणगेकर, डॉ. माशेलकर, थोरात यांनी तो अहवाल दिला होता, त्यांना तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहात का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच धोरण..
नवे धोरण ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत, यासाठी हे सूत्र तयार करण्यात आले आहे. ते तयार करताना विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये भाषा शिकण्याची क्षमता कधी असते, याचे संशोधन केले गेले आहे. अधिकच्या भाषा विद्यार्थी शिकू शकतात. हा काही आमच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा नाही. आम्ही एका मिनिटात सांगितले कोणतीही भाषा शिका. प्रश्न हिंदी सक्तीचा नाही, हिंदीला विरोधाचा आहे. यांचा हिंदीला विरोध आहे.
गंमत म्हणजे, इंग्रजीला विरोध नाही!
फडणवीस म्हणाले, की मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते, भारतात तुमचा इंग्रजीला विरोध नाही. यांच्यापैकी एकानेही इंग्रजीला विरोध केलेला नाही. भारतीय भाषा असलेल्या हिंदीला विरोध करण्यात येत आहे. हा विरोधाभास आहे. मराठी आणि हिंदी स्पर्धा आली तर आधी मराठी. मराठी आमची मायबोली आहे, त्यामुळे सक्तीची मराठीच. पण, आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या असतील, तर हरकत काय? तीन भाषा शिकल्या नाहीत, तर त्या विषयाचे क्रेडिट मिळणार नाही. चांगले टक्के मिळवूनही क्रेडिटचे मार्क दुसऱ्याजवळ जास्त असल्याने त्याला तो प्रवेश मिळेल, असे ही देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
भाजपा प्रवक्त्याची टीका..
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. ‘हे तर पुतना मावशीचे प्रेम आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या ‘जीआर’ ची होळी करण्याचा आदेश दिला आहे. मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचे मराठी प्रेम ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरवस्थेची आठवण आली नाही का?
मुंबईतील मराठी शाळा बंद..
मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या १५ वर्षात ४०० वरून २८० पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून ३५ हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेले उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम ?’, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. सांगण्यासारखा आणखी एक मुद्दा म्हणजे शरद पवार गटाने २०२० मध्ये ‘हिंदी भाषा जोडो अभियान’ केले होते, त्याचे उद्धाटन त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत, हा मोठा विनोद आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.
केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून…
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून त्या डोळ्यासमोर ठेवून सर्व विरोधकांचे मराठी प्रेम ऊतू चालले आहे. निवडणुका नसत्या तर हे विरोधक एवढे आक्रमक झालेच नसते. चुका केल्या यांनी, आम्ही दुरुस्त केल्या पण ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मते मिळवायची, हा यांचा उद्योग झाला आहे. जनता एकदा फसली आता फसणार नाही, अशी टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.





