TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रारुप मतदार यादी जाहीर; 2.06 कोटी नावं वगळली, तुमचं नाव आहे का? असं तपासा

SIR 2026 अंतर्गत 7.71 कोटी मतदारांचा प्रारुप यादीत समावेश; दावे-हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 प्रक्रियेअंतर्गत राज्याची प्रारुप मतदार यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, तसेच वगळलेल्या यादीत नाव आहे का, हे मतदारांना ऑनलाइन तपासता येणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी महाराष्ट्रात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार होते. पुनरीक्षणानंतर जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 पुरुष, 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 महिला आणि 3,087 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

2 कोटींहून अधिक नावं का वगळली?

प्रारुप मतदार यादीतून वगळलेल्या किंवा गणना न झालेल्या मतदारांची संख्या 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 आहे. यामध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे.

प्रारुप मतदार यादीत नाव कसं तपासायचं?

मतदारांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र किंवा भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट द्यावी. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर ‘Draft Electoral Roll SIR 2026’ हा पर्याय निवडावा.

त्यानंतर राज्य महाराष्ट्र, वर्ष 2026 आणि SIR Draft Roll 2026 निवडून जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि भाषा निवडावी. कॅप्चा भरल्यानंतर संबंधित विधानसभा मतदारसंघातील यादीचा भाग निवडून ‘Download Selected PDFs’ या पर्यायातून मतदार यादी डाउनलोड करता येईल. डाउनलोड केलेल्या PDFमध्ये आपले नाव तपासता येईल.

हेही वाचा –  आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे आयोजन

वगळलेल्या यादीत नाव कसं तपासायचं?

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाइटवर ‘ASSD List (Absent, Shifted, Dead, Duplicate) SIR 2026’ हा पर्याय उपलब्ध आहे. येथे मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून आपले नाव वगळण्यात आले आहे का, हे तपासता येईल. मतदान केंद्रनिहाय वगळलेल्या मतदारांची यादीही डाउनलोड करता येणार आहे.

दावे-हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे-हरकती दाखल करता येतील.

यानंतर प्रक्रिया पूर्ण करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 हा वय अर्हता दिनांक असून, त्या दिवशी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button