‘निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ते दैनिक ‘सामना’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाहीये. ते नाव माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात. कोणीही उठले आणि शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील आणि जेव्हा जोड्याने फिरतील तेव्हाच येईल.
हेही वाचा – महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी
मणिपूर हिंसेवरूनही उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली. मणिपूर दिल्लीत चिनी ड्रॅगन शिरला आहे. गोमूत्र शिंपडल्यावर ते परत जातील का? हे हिंदुत्व नाहीये. देशाचं रक्षण करणं हे हिदुत्व आहे, असं सांगतानाच देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशाचं संरक्षण हे माझं हिदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्या हिंदुत्वाला शेंडा बुडखा आहे काय? त्यांचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोवंश बंदी महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात नाही. त्रिपुरातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष गोमांस खातो. संघाचे होसबळे म्हणतात, गोमांस खाणाऱ्यांना दरवाजे बंद करता येणार नाहीत. मग तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी कसं? एकीकडे तुम्ही गोवंश हत्याबंदी करता, दुसऱ्या ठिकाणी कोणाकडे गोमांस सापडलं तर संशायावरून मारून टाकता. मॉब लिचिंग होतं. दुसऱ्या राज्यात मात्र गोमांस खाऊ देता. भाजपचे नेतेच गोमांस खातो म्हणून सांगतात. मग त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





