TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पावसाची तूट कायम; १४ जिल्ह्यांत २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट

ऑगस्टमध्ये ‘एल निनो’चा मध्यम प्रभाव; पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमी

मुंबई : मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला असला, तरी अनेक भागांतील पावसाची तूट अद्याप कायम आहे. राज्यातील तब्बल १४ जिल्ह्यांमध्ये २० ते ४० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती ऑगस्टमध्ये मध्यम, तर सप्टेंबरमध्ये मध्यम ते तीव्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर पुन्हा ओसरल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील बहुतांश भागात सरासरीच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा –  पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित होणार; पोलिसांकडून कारवाईचा मास्टर प्लॅन

विभागनिहाय स्थिती पाहता कोकणात सरासरीपेक्षा चार टक्के कमी, मराठवाड्यात १६ टक्के कमी, तर विदर्भातही १६ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्याउलट मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, लातूर, जालना, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ३९ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट कायम आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाल्याने तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थिती ऑगस्टमध्ये मध्यम, तर सप्टेंबरमध्ये मध्यम ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑगस्टच्या उत्तरार्धात बंगालच्या उपसागरात एखादी हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास राज्यातील काही भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात १ जून ते १५ ऑगस्टदरम्यान सरासरी ६०६.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा १,०३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा ७१ टक्के अधिक आहे. पालघरमध्ये ३९ टक्के, मुंबईत २५ टक्के, पुणे जिल्ह्यात ४५ टक्के, सातारा जिल्ह्यात ३८ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button