TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित होणार; पोलिसांकडून कारवाईचा मास्टर प्लॅन

आठ महिन्यांत ध्वनिप्रदूषणाच्या १४,३९२ तक्रारी; पर्वती, कोंढवा, चतुःशृंगी आणि येरवड्यात सर्वाधिक तक्रारी

पुणे : शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता ध्वनिप्रदूषणाच्या ‘हॉटस्पॉट’वर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांकडून तब्बल १४ हजार ३९२ कॉल पोलिसांना प्राप्त झाले आहेत. यामध्ये पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक तक्रारी असल्याचे समोर आले आहे.

शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींचे पोलिसांकडून विश्लेषण करण्यात येणार असून, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच प्रमुख ध्वनिप्रदूषणाची ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ म्हणून निश्चित केली जाणार आहेत. या ठिकाणी ध्वनी कोणत्या कारणामुळे निर्माण होतो, तो नेमका कुठून येतो, कोणत्या वेळेत आवाजाची तीव्रता वाढते आणि तक्रारी कोणत्या भागातून प्राप्त होतात, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.

शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम, मिरवणुका तसेच उत्सवांमध्ये डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी वाढतात. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या तक्रारींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आतापासूनच हॉटस्पॉट निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा –  थेरगावच्या ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’चा अन्वय सामग बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकाचा धनी!

ही कारवाई केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता सर्व धर्मांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरही लक्ष ठेवले जाणार आहे. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आलेल्या तक्रारींची माहिती संकलित केली जाणार आहे. तक्रारदार कोणत्या परिसरात राहतो, कोणत्या ठिकाणच्या किंवा कोणत्या कार्यक्रमातील आवाजाबाबत तक्रार करण्यात आली, तसेच संबंधित ठिकाणी यापूर्वी किती तक्रारी आल्या आहेत, याची नोंद केली जाईल.

वारंवार तक्रारी येणारी ठिकाणे निश्चित करून तेथे ‘हॉटस्पॉट मॅनेजमेंट’ राबविण्यात येणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणी ध्वनीची पातळी तपासणे, डेसिबलची निर्धारित मर्यादा तपासणे आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.

पुणे शहरातील पर्वती, कोंढवा, चतुःशृंगी आणि येरवडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ हडपसर परिसरातही तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.

तर लोणीकंद, फुरसुंगी आणि लष्कर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी तुलनेने कमी असल्याचे पोलिसांच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. आगामी काळात हॉटस्पॉट निश्चित करून या ठिकाणी नियमित देखरेख आणि तातडीच्या कारवाईला प्राधान्य दिले जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button