पिंपळे सौदागर येथील ट्रायोज–झूलेलाल टॉवर रस्त्याच्या प्रश्नाला गती!
सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन

– भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने नागरिकांशी थेट संवाद
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी :
ट्रायोज ते झूलेलाल टॉवर सोसायटी परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्यासह स्थानिक नागरिक व सोसायटी प्रतिनिधींशी थेट संवाद साधत रस्त्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
पिंपळे सौदागर परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता ट्रायोज–झूलेलाल टॉवर रस्ता नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याची अपुरी रुंदी, वाहतुकीची वाढती समस्या आणि कामातील विविध तांत्रिक व प्रशासकीय अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या थेट शत्रुघ्न काटे यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत रस्त्याच्या रुंदीकरणासह आवश्यक विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही देण्यात आली.
हेही वाचा – पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित होणार; पोलिसांकडून कारवाईचा मास्टर प्लॅन

या प्रश्नासाठी नगरसेविका अनिता काटे यांनीही सक्रिय भूमिका घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक प्रशासकीय समन्वय आणि पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा, यासाठी त्यांनी बैठकीत आपली भूमिका मांडली. नगरसेविका कुंदाताई भिसे यांनीही नागरिकांच्या समस्या जाणून घेत रस्त्याच्या विकासकामाला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.
या बैठकीमुळे ट्रायोज–झूलेलाल टॉवर परिसरातील नागरिकांच्या रस्त्याच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अनिता काटे आणि कुंदाताई भिसे यांच्या समन्वयातून रस्ता रुंदीकरण व विकासकामाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. बैठकीस स्थानिक नागरिक, सोसायटीचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“ट्रायोज ते झूलेलाल टॉवर हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित विभागांशी समन्वय साधून सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या सहा महिन्यांत या रस्त्याच्या कामाला ठोस गती देऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देण्याचा आमचा निर्धार आहे.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





