#CoronaVirus: कोरोना विषाणूचा भारतात 5वा बळी
कोरोना विषाणूने भारतात आणखी एकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाच वर पोहचला आहे. राजस्थानमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण इटलीवरुन राजस्थान येथे आला होता. राजस्थानमधील एका रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आतापर्यंत देशामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक-एक कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
देशामध्ये कोरोना विषाणू वेगाने परसत आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये १९५ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामधील १६३ रुग्ण हे भारतीय आहेत. तर ३२ परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ५२ रुग्ण आढळले आहेत. देशभरामध्ये २० कोरोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.





