‘देशात सध्या मेक इन इंडिया नाही तर…’, राहुल गांधींच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

महाईन्यूज | दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. राहुल गांधी यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करून देशातील समस्त महिलांचा अपमान केला असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राहुल गांधी यांचं हे वक्तव्य नींदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी गुरूवारी झारखंडमध्ये एका रॅलीला संबोधित केलं होतं. त्यावेळी बोलताना ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं ते म्हणाले होते.
झारखंड पासून उत्तर प्रदेशपर्यंत कुठेही पाहा, बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. भाजपाचे एक आमदारही बलात्काराच्या खटल्यात आरोपी आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावरही काहीच बोलत नाहीयेत व पंतप्रधान ‘बेटी बचाव’चा नारा देतात आणि परंतु कोणापासून मुलींचं संरक्षण करायचं हे सांगत नाही. त्यांना भाजपाच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेनंतर राज्यसभेतही गदारोळ पहायला मिळाला. राज्यभेतीलही काही सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी सभागृहात घोषणाबाजी केली. जी व्यक्ती या सभागृहाची सदस्य नाही त्याचं नाव तुम्ही घेऊ शकत नाही. कोणीही सभागृहाची शांतात भंग करू नये, असं यावेळी सभापती व्यंकय्या नायडून यांनी सदस्यांना सांगितलं.





