अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांच्या पाठलागानंतर आरोपीची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

California Stalker Shooting Shalini Thakur | अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो येथे ३८ वर्षीय शालिनी ठाकूर या भारतीय वंशाच्या महिलेचा पाठलाग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिचा लैंगिक आणि मानसिक छळ करणाऱ्या रोहित (वय २२) नावाच्या तरुणाने भर रस्त्यात लागोपाठ गोळ्या झाडून तिचा जीव घेतला. या थरारानंतर पोलिसांनी महामार्गावर घेराव घातल्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्डेन आर्केड परिसरातील एका शॉपिंग प्लाझामध्ये शालिनी ठाकूर कामाच्या ठिकाणी जात असताना बेकायदेशीर स्थलांतरित असलेल्या रोहितने तिला गाठले. शालिनीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्यावर गोळ्या झाडल्या. ती जमिनीवर कोसळल्यानंतर त्याने अत्यंत निर्दयीपणे जवळून तिच्या डोक्यात आणखी एक गोळी झाडली. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा
सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
महामार्गावर थरार; आरोपीची आत्महत्या
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीच्या गाडीची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. ‘ऑटोमेटेड लायसन्स प्लेट रीडर’च्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत ईस्टबाउंड हायवे ५० वर पोलिसांनी त्याची कार शोधून काढली. पोलिसांनी गाडी अडवताच आरोपीने महामार्गावरच गाडी थांबवली. पोलिसांनी कारला वेढा घालून ड्रोनच्या साहाय्याने पाहणी केली असता, चालक सीटवर आरोपी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळला. पोलिसांच्या भीतीने त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
छळ, पाळत अन् लग्नासाठी दबाव
न्यायालयीन नोंदींनुसार, शालिनी ठाकूर आणि आरोपीची ओळख डोअरडॅश पिकअपच्या माध्यमातून झाली होती. आरोपी रोहित तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि तिच्यावर सातत्याने पाळत ठेवत होता. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने तिच्या कारखाली ‘Apple AirTag’ लावला होता, तिच्या कारचे टायर पंक्चर केले होते, तसेच घराची बनावट चावी बनवून ती झोपेत असताना तिच्या घरातही घुसखोरी केली होती. या प्रकरणी पीडितेने प्रतिबंधात्मक आदेशही मिळवला होता, मात्र तरीही आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले.




