मनोज जरांगेंचा मुंबईकडे मोर्चा; १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
१५ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने कूच; पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीत मुक्काम, शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी शनिवारी स्पष्ट केले. आंदोलनाच्या १५व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक १५ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होईल. त्यानंतर १६ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, १७ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातील हडपसर आणि १८ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आंदोलकांचा मुक्काम असेल. त्यानंतर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे तळ ठोकून मुंबईत प्रवेश केला जाणार आहे.
आंदोलक दररोज सुमारे १०० किलोमीटरचे अंतर कापणार असून, १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा – OYO Rooms वर पोलिसांची करडी नजर; 90 दिवसांचे CCTV फुटेज ठेवणे बंधनकारक
शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन
आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून परत न जाण्याचा निर्धार व्यक्त करताना जरांगे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, वाहने व्यवस्थित चालवावीत आणि आचारसंहितेचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून न्याय्य मागणी पूर्ण करून घेण्याची भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या मार्गात अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहनही जरांगे यांनी केले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर शांततेत बसावे, मात्र बॅरिकेड्सला हात लावू नये, असे निर्देश त्यांनी दिले. आंदोलकांना रोखल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
५८ लाख कुणबी नोंदींचा मुद्दा ऐरणीवर
५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी सरकारवर टीका केली. हा मुद्दा आता मुंबईत नेणार असून, ‘हा अंतिम लढा आहे, एकही मराठा घरी बसता कामा नये’, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
दरम्यान, महिलांनी महालक्ष्मी उत्सवानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या निवासस्थानी शांततापूर्णरीत्या भेट देऊन आरक्षणाची मागणी मांडावी आणि पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे.





