Breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार नाही: शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे स्पष्ट करत शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेवर भाजपा अवलंबून होता. पण शिवराज सिंह चौहान यांना हा गड राखता आला नाही. २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला १०९ जागांवर विजय मिळाला आहे. अपक्ष उमेदवार ४ जागांवर निवडून आले असून बहुजन समाज पक्षाला २ आणि समाजवादी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. मध्य प्रदेश विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. मात्र, एकाही पक्षाला ही मॅजिक फिगर गाठता आली नव्हती. काँग्रेस बहुमतापासून २ जागा दूर आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात आमदारांचे पाठबळ हवे होते. त्यामुळे घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता होती.

मात्र, शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नाही, असे स्पष्ट केले. आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार नाही, आम्हाला जनादेश मान्य आहे, मी पत्रकार परिषदेनंतर राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करणार, असे त्यांनी सांगितले. या पराभवाची जबाबदारी माझी असून मतांची टक्केवारी जास्त असूनही आम्ही संख्याबळात कमी पडलो, असे त्यांनी नमूद केले.

शिवराज सिंह यांनी सत्तास्थापनेसाठी दावा न करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा मार्क मोकळा झाला आहे. बहुजन समाज पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून यामुळे काँग्रेसला ११६ ची मॅजिक फिगर गाठण्यात यश आले आहे. समाजवादी पक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसकडील संख्याबळ ११७ इतके झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button