breaking-newsक्रिडा

हरयाणाचा पंजाबवर 2-0ने सहज विजय

  • खेलो इंडिया स्पर्धा 2019 : महाराष्ट्र व दिल्ली लढत बरोबरीत

मुंबई – विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या हरयाणाने पंजाबवर 2-0 अशी मात करीत खेलो इंडियातील मुलांच्या 17 वर्षाखालील गटात शानदार प्रारंभ केला. तर, यजमान महाराष्ट्राला दिल्लीविरुद्धची लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली.

महिंद्रा हॉकी स्टेडियमवर या स्पर्धेस प्रारंभ झाला. पंजाबविरुद्धच्या लढतीत हरयाणाच्या साहिल शर्मा याने 45 व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनी त्याचा सहकारी अंकित मलिक याने गोल करीत संघाची आघाडी वाढविली. 2-0 अशी आघाडी ठेवीत त्यांनी हा सामना जिंकला. पूर्वार्धात बराच काळ खेळाची सूत्रे असूनही पंजाबला गोल नोंदविण्यात अपयश आले.

सामन्याच्या 45 व्या मिनिटापासून हरयाणाने नियंत्रण मिळविले व अखेरपर्यंत टिकविले. साखळी ब गटातील अन्य लढतीत चंडीगढ संघाने झारखंड संघाला 3-0 असे सहज हरविले. सहाव्या मिनिटाला त्यांच्या सुरिंदर याने संघाच्या गोलांचा श्रीगणेशा केला. या गोलच्या आधारे त्यांनी पूर्वार्धात आघाडी घेतली होती.

मध्यतंरानंतर रोहितकुमार याने सामन्याच्या 47 व्या मिनिटाला संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 55 व्या मिनिटाला त्याचा सहकारी रमण याने आणखी एक गोल करून संघाची बाजू बळकट केली. ही आघाडी कायम ठेवीत त्यांनी सामना जिंकला.

महाराष्ट्र व दिल्ली यांच्यातील सामना चुरशीने खेळला गेला. अ गटातील या सामन्यात धैर्यशील जाधव याने 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करून संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तथापि दिल्ली संघाच्या प्रशांतकुमार याने 18 व्या मिनिटाला गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली.

कौस्तुभ बाराधिया याने 19 व्या मिनिटाला गोल करीत महाराष्ट्राला पुन्हा आघाडीवर नेले. तथापि दिल्ली संघाच्या प्रशांतकुमार यानेच पुन्हा गोल करीत महाराष्ट्राला विजयापासून वंचित ठेवले. तर, चंदीगढच्या संघाने झारखंडचा सहज पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button