हनुमान मंदिरातून पुजाऱ्याला बाहेर काढले; दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील पुजाऱ्याला धक्काबुक्की करुन मंदिरातून बाहेर काढल्याप्रकरणी दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिकी क्रांती दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर राष्ट्रीय ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रीय परशूराम सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यातील हनुमान मंदिरांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे.
बुधवारी वाल्मिकी क्रांती दल या दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात धडक दिली. आंदोलकांनी मंदिरातील पुजारी सच्चिदानंद यांना धक्काबुक्की करत बाहेर काढले. यानंतर कार्य़कर्त्यांनी मंदिरात पुजा केली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वाल्मिकी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
वाल्मिकी क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गंभीर म्हणाले, आम्ही हनुमंदिरात गेलो आणि मंदिराचे व्यवस्थापन आमच्या ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही पुजाऱ्याला धक्काबुक्की केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रीय परशूराम सेना या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील ५०० हनुमान मंदिरांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.