breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नागरिकांच्या मुळावर महावितरणचा कारभार

पुणे – राज्यभरातील वीजयंत्रणा आणि वीजवाहिन्यांची पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या महावितरणला धोकादायक ट्रान्सफार्मरचा प्रश्‍न गेल्या कित्येक वर्षांच्या कालखंडात सोडविता आलेला नाही. यामुळेच आतापर्यंत राज्याच्या बहुतांशी भागात अनेक अपघात झाले असून निष्पाप नागरिकांना आणि मुक्‍या जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. दीड महिन्यांपूर्वी खराडी येथे उच्चभ्रु परिसरात झालेल्या अपघातामध्ये एका तरुणीसह दोघांना त्यांचा जीव गमवावा लागला, त्यामुळे धोकादायक ट्रान्सफार्मरचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

धोकादायक ट्रान्सफार्मरमुळे महावितरणची अब्रु अक्षरश: चव्हाट्यावर टांगली गेली आहे, तरीही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे हजारो नागरिकांच्या मुळावर उठलेल्या या ट्रान्सफार्मरचा बंदोबस्त प्रशासनाला करावाच लागणार आहे. अन्यथा नागरिकांच्या संतापाचे शॉर्टसर्किट झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा उद्रेक प्रशासनाला निश्‍चितच परवडणारा नाही. ट्रान्सफार्मर हा महावितरणच्या यंत्रणेचा आत्मा समजला जातो. याच्या माध्यमातूनच नागरिकांना अथवा औद्योगिक क्षेत्राला वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या ट्रान्सफार्मरची वारंवार देखभाल करणे ही महावितरणच्या यंत्रणेची जबाबदारी आहे. विशेष म्हणजे शहरी अथवा ग्रामीण भागातील बहुतांशी ट्रान्सफार्मर हे नागरी वसाहतीतच असल्याने नागरिकांना त्याचा तात्काळ धोका पोहचण्याची भीती असते. त्यामुळे या ट्रान्सफार्मरची विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आदेशच राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या सर्व परिमंडलांना दिले आहेत. मात्र; त्यांची विशेष काळजी घेतली जात नसल्याचे आतापर्यंत घडलेल्या अपघातांवरुन स्पष्ट झाले आहे.

ट्रान्सफार्मरच्या क्षमतेनुसार त्यांची ठराविक कालावधीत देखभाल आणि दुरुस्ती केलीच पाहिजे तसेच ठराविक कालावधीत त्याचे ऑईल बदलले पाहिजे असा नियम आहे. मात्र; बहुतांशी ट्रान्सफार्मरची अशी देखभालच होत नाही. त्यामुळेच पाच ते सात वर्षांपूर्वी सहकारनगर भागात भर वस्तीत असलेल्या एका ट्रान्सफार्मरचा स्फोट होउन पाचजणांना जीव गमवावा लागला होता. मात्र; हे वास्तव असतानाही महावितरण प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. दीड महिन्यांपूर्वी खराडी येथे अशाच एका ट्रान्सफार्मरचा स्फोट होउन दोघांना जीव गमवावा लागला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये प्रशासनाची चूक असल्याचे जगजाहीर असतानाही संबधित यंत्रणेने महावितरण प्रशासनाला आणि संबधित अधिकाऱ्यांना क्‍लिन चिट दिली आहे. त्यामुळे या निष्पाप जीवांना आणि त्यांच्या कुटुबिंयांना न्याय मिळालेला नाही. मात्र, या घटनेतून महावितरण प्रशासनाने आता तरी धडा घेण्याची गरज आहे. अन्यथा आगामी कालावधीतही महावितरण प्रशासनाचा कारभार नागरिकांच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button