breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

स्वार्थासाठीच अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये!

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

मुंबई : मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाही देण्याबाबत ठरल्याचा दावा जनआशीर्वाद यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करीत असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत काय ठरलेय किंवा नाही ते आम्हाला माहिती नाही. अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळी आम्हाला सांगतील त्या वेळी तसे करू, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

त्याचबरोबर स्वार्थासाठीच इतर पक्षांतील लोक भाजपमध्ये येत असून ते साहजिकच आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागणी कोणीही करू शकतो. महत्त्वाकांक्षा नसेल तर विकास होत नाही, असे उद्गारही पाटील यांनी काढले. इतर पक्षांतील नेते-आमदार हे स्वार्थासाठी भाजपमध्ये येत आहेत हे साहजिकच आहे. सत्तेत पक्ष असला की मतदारसंघातील कामे होतात हा हेतू अनेकांचा असतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्य़ातील मोझरी येथून १ ऑगस्टपासून सुरू होईल. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांच्या जयंतीदिनी सुरू होणाऱ्या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

महाजनादेश यात्रा

’ दोन टप्प्यांत राज्यातील ३२ जिल्ह्य़ांतून ४,३८४ किलोमीटरची ही यात्रा असेल. एकूण १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे.

’ ८७ मोठय़ा सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून ही यात्रा नाशिकला पोहोचेल.

’ प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर हे महाजनादेश यात्रेचे प्रमुख म्हणून सर्व नियोजन-समन्वय करतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

’ विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात १४ जिल्ह्य़ांतील ५७ विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाईल.

’ पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. तर यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी अहमदनगरमधील अकोले येथून सुरू होईल.

’ दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्य़ातील ९३ विधानसभा मतदारसंघातून जाईल.

मोदी-शहा यांना आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या उद्घाटनावेळी पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तर समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button