breaking-newsताज्या घडामोडीलेख

समाजसेवक बाबा आमटे यांचा आज स्मृतीदिन…

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा स्मृतीदिन आहे…बाबा आमटे हे एक समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. तसेच आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी अनेक संस्थाही स्थापन केल्या आहेत…त्यामध्ये आनंदवन – वरोरा (चंद्रपूर), सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर), अशोकवन – नागपूर, लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा…

बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. इ.स. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे.

भारत छोडो आंदोलन, वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन आदि विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभागी घेतला. त्यामुळेच त्यांना सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या ध्येयवेड्या व्यक्तीमत्त्वाला महात्मा गांधी यांनी ‘अभय साधक’ असे संबोधले होते…

महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला.

नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.१९४२ च्या सुमारास एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.    

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button