breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सौ चुहे खाके, बिल्ली चली हज को’ राष्ट्रवादीची भाजपावर टीका

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

राज्यात सत्ता असताना तब्बल पाच वर्षे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री न देणार्‍या आणि संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्‍या भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ याच म्हणीप्रमाणे आहे. सत्ता गेल्याचे दुख: हे लोक अद्यापही पचवू शकलेले नसून ‘हिंगणघाट’ येथे घडलेल्या दुर्देवी घटनेचे भाजपाचे चालविलेले राजकारण हे खेदजनक आणि संताप निर्माण करणारे असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यस्था तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी न करता फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आकुर्डी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे संजोग वाघेरे यांनी टीका केली आहे.

वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2014 ते 2019 या कालावधी राज्यात भाजपाचे सरकार होते. या सरकारच्या काळात राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला नाही. पाच वर्षांच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यस्थेचे दिवाळे निघाले होते. मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरचा क्राईमरेट संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक होता. पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर 15 ऑगस्ट 2018 ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधी 12 हजार गुन्हे घडले.

खून, दरोडे, अवैध धंदे, बलात्कार या सारख्या घटनांमुळे देशातील असुरक्षित राज्य म्हणून महाराष्ट्राचा वरचा क्रमांक असल्याचे केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आले. या काळात आंदोलन करणार्‍या एकाही नेत्याला तोंड उघडून विरोध करता आला नाही. ज्या पक्षाचा आमदार तरुणीवर बलात्कार करतो, तिच्या कुटूंबियांच्या सदस्यांची हत्या करतो, त्या पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी कायदा सुव्यवस्थेची भाषा करतात हा मोठा विनोदच असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.

हिंगणघाटची घटना दुर्देवी असून राज्याचे गृहमंत्री दोनवेळा पीडितीच्या कुटूंबियांना भेटले आहेत. आरोपीला अटक करून पीडितेला न्याय देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तेलंगणाच्या धर्तीवर राज्यात कडक कायदा करून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण गृहमंत्रालय कामाला लागले आहे. पीडितेच्या कुटूंबियांना आवश्यक ती मदत केली जात आहे. मात्र भाजपाला या दुर्देवी घटनेवरही आंदोलन करून राजकीय पोळी भाजायची आहे ही बाबच खेदजनक आहे. राजकारण कोणत्या गोष्टीचे करावे याचे भान त्यांनी ठेवायला हवे, असेही वाघेर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केवळ 50 दिवस झालेत..

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबतही वाघेरे यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने 2014 मध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. दीड लाखांची कर्जमाफी देण्यासाठी त्या सरकारला 2019 उलगडले होते. विशेष म्हणजे सर्वांना कर्जमाफीही देण्यात आली नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा विस्तार होऊन केवळ पन्नास दिवस झाले आहेत. तरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र चांगल्या होणार्‍या गोष्टी यांना मान्य नसून सत्ता गेल्याच्या दुख:तून त्यांना बाहेर पडणे मुश्किल झाल्यामुळेच त्यांचे आंदोलन आणि आरोप सुरू आहेत. जनताही भाजपाच्या लोकांची ‘नौटंकी’ ओळखून असल्यामुळे अशा आंदोलनाचा कोणताही परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवर तथा जनतेवर होणार नसल्याचा विश्वासही वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button