सायनाचा संघर्षपूर्ण विजय
पॅरिस : भारताच्या सायना नेहवालला फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीत सायनाने ४२ मिनिटे चाललेल्या सामन्यात हाँगकाँगच्या चेऊंग एनगॅन यि हिचा २३-२१, २१-१७ असा पाडाव केला. पुरुष एकेरीत श्रीकांतने ५५ मिनिटांच्या झुंजीनंतर चायनीज तैपेईच्या द्वितीय मानांकित चोऊ टीन चेनकडून १५-२१, २१-७, २१-१४ अशी हार पत्करली, तर कश्यपचा हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसविरुद्धच्या लढतीत ११-२१, ९-२१ असा निभाव लागला नाही. समीर वर्मालाही पहिलाच अडथळा ओलांडण्यात अपयश आले. जपानच्या केंटा निशिमोटोने त्याचा २०-२२, २१-१८, २१-१८ असा पराभव केला. आता पुरुष गटात भारताच्या आशा फक्त शुभंकर डे याच्यावर अवलंबून आहेत.
मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा तसेच प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडय़ा पराभूत झाल्या. कोरियाच्या चौथ्या मानांकित सेओ सेऊंग जाई आणि चाई युजंग जोडीने सात्त्विक-अश्विनीचा २१-१७, २१-१८ असा पराभव केला. याचप्रमाणे इंग्लंडच्या ख्रिस आणि गॅब्रिएल अॅडकॉक जोडीने प्रणव-सिक्की जोडीला २१-१३, २१-१८ असे नामोहरम केले.