साध्वी ठाकूर यांना संशयास्पद पत्र, पंतप्रधान मोदी, डोभाल आणि योगी आदित्यनाथ यांचेही फोटो, ‘पत्राचे पुणे कनेक्शन’
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच प्रसिध्दीझोतात राहिलेल्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घरी पोस्टाद्वारे एक संशयास्पद पत्र पाठवण्यात आले आहे. ते पुण्यातून पाठवण्यात आले असून त्यावरील पत्ता शिवाजी चौक खडकी बाजार खडकी, ता. जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद या व्यक्तीचा पाठवणारा म्हणून उल्लेख त्या पत्रावर करण्यात आला आहे. या धमकीवजा पत्राने चांगलीच खळबळ उडाली आहे.
खासदार ठाकूर यांना पाठविण्यात आलेले पत्र उर्दु भाषेत आहे. त्यासोबत दोन पुड्या पांढर्या रंगाची पावडरदेखील पाठवली आहे. या पावडरला हात लावल्यानंतर खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. भोपाळ येथील स्थानिक पोलिसांनी पत्र व सोबतची पावडर ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरू केला आहे.
पत्रामध्ये पंतप्रधान मोदी, सुरक्षा सल्लागार डोभाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोचादेखील समावेश आहे. त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा केल्या आहेत. समोर फोटोमध्ये या सर्वांवर बंदूक रोखल्याचे दिसून येते.
याबाबत पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही. तसेच, चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.