breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेनेसाठी भाजपाची माघार, नाणार प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याच्या हालचाली

कोकणातील राजापूर तालुक्यात नाणार येथे उभारण्यात येणारा तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प हटवण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी जमिनीचा शोध घेतला जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र अद्याप राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. फ्री प्रेस जनरलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सध्या भाजपा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असून युतीमध्ये नाणार प्रकल्प अडचण ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. नाणार प्रकल्पासाठी रायगडमधील रोहा ते माणगाव दरम्यान जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी रत्नागरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीने चामेराजवळ असणारी 300 एकर जमीन संपादित केली आहे. ही जमीन राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टिलायजर्ससाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ही जमीन रत्नागरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडला हस्तांतरित केली जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. चामेरा एमआयडीसी रोहा-रेवदंडा रोडवर असून रोहापासून 30 किमी अंतरावर आहे.

याव्यतिरिक्त 700 एकर खासगी जमीन आणि 450 एकर जमीनदेखील परिसरात उपलब्ध आहे. 450 एकर जमीन निझामाच्या वंशजांना इनामी दिलेली आहे. ही जमीनदेखील एमआयडीसीला दिली जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी या जागेचा विचार केला जात आहे.

दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाणार प्रकल्पावर आपली नेमकी काय भूमिका आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘नाणार प्रकल्पाबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी शिवसेना भाजपने हातमिळवणी केली की काय अशी शंका येत आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नाणारबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी’.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रद्द झाला नसून नाणारमधून बाहेर जाणार नाही असं म्हटलं होतं. पण नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सरकारने स्थगित केली असून सध्या कोणतीही प्रक्रिया सुरू नाही, असे जाहीर केले होते. प्रकल्पाची घोषणा झाल्यापासूनच स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. एकीकडे भाजपा या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असताना शिवसेना मात्र ग्रामस्थांच्या बाजूने उभी राहिली होती. शिवसेना नेत्यांनी आपल्याला याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नसून तसं झाल्यास आमच्यासाठी हा मोठा विजय असेल असं म्हटलं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button